दक्षिण कोरियात कारवाई : अध्यक्षीय प्रासादात शिरले 1 हजार पोलीस
वृत्तसंस्था/ सोल
दक्षिण कोरियात महाभियोगाला सामोरे जाणारे अध्यक्ष यून सुक योल यांना अटक करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी दक्षिण कोरियाचे अधिकारी यून सुक सोल यांना अटक करण्यासाठी अध्यक्षीय प्रासादात दाखल झाले. भ्रष्टाचार तपास कार्यालयाने यून यांना स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजून 33 मिनिटांनी अटक करण्यात आल्याची माहिती दिली आहे. यापूर्वी 3 जानेवारी रोजी अटक करण्यासाठी पोहोचलेली टीम आणि अध्यक्ष सुरक्षा सेवेदरम्यान झटापट झाली होती, ज्यानंतर टीमला माघारी परतावे लागले हेते. यावेळी अधिक संख्येत पोहोचलेल्या पोलिसांसोबत अधिकारी अध्यक्षीय प्रासादात शिरण्यास यशस्वी ठरले.
स्थानिक प्रमाणवेळेनुसार पहाटे 4.20 वाजल्यापासूनच अधिकारी अध्यक्षीय प्रासादाबाहेर पोहोचू लागले होते. यादरम्यान तेथे मोठ्या संख्येत यून समर्थक आणि विरोधक एकवटू लागले होते. सुमारे 1 हजार पोलीस अधिकाऱ्यांच्या टीमने अध्यक्षीय प्रासादात वेगवेगळ्या मार्गांनी शिरण्याचा प्रयत्न केला आणि हा यशस्वी ठरला.
अध्यक्ष सुरक्षा सेवेचे अंतरिम प्रमुख किम सुंग-हून यांना अटक करण्यात आल्याचे वृत्त पोलिसांनी फटाळले आहे. किम यांच्यावर यून यांना अटक करण्याच्या मागील प्रयत्नात अडथळे निर्माण करण्याचा आरोप आहे. याचदरम्यान महाभियोगाला सामोरे जाणारे अध्यक्ष यून सुक योल यांच्या टीमने भ्रष्टाचार तपास कार्यालयासमोर स्वेच्छेने हजर राहण्याच्या शक्यतेवरून चर्चा करण्याचा प्रयत्न केला. परंतु कार्यालयाने तो नाकारला आहे.
तपासकर्त्यांनी शिडींचा वापर करत अध्यक्षीय प्रासादात प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांना सत्तारुढ पक्षाचे खासदार आणि यून यांच्या वकिलांनी प्रवेशद्वारावर रोखले होते. यून अनेक आठवड्यांपासून सोल येथील स्वत:च्या अधिकृत निवासस्थानातून बाहेर पडले नव्हते. अध्यक्षांच्या सुरक्षा सेवेत सामील अधिकाऱ्यांचे तीन जानेवारी रोजी जवळपास 6 तासांपर्यंत पोलिसांशी वाद झाला होता. हे पोलीस यून यांना अटक करण्यासाठी तेथे पोहोचले होते
मार्शल लॉ लागू करण्याचा निर्णय अंगलट
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संबंधित अशी प्रकरणे हाताळणारे भ्रष्टाचार तपास कार्यालय आणि पोलिसांनी यून यांना ताब्यात घेण्यासाठी आणखी अधिक कठोर पाऊल उचलण्याचा संकल्प घेतला होता. 3 डिसेंबर रोजी यून यांच्याकडून काही काळासाठी मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा बंडाच्या प्रयत्नासमान होती का याचा तपास भ्रष्टाचार तपास कार्यालय आणि पोलीस संयुक्तपणे करणार आहेत. वॉरंट बजावण्यात अडथळा आणणाऱ्या अध्यक्षांच्या सुरक्षारक्षकांनाही अटक केली जाऊ शकते असा इशारा तपास यंत्रणा आणि पोलिसांनी दिला आहे.









