अभिनंदन संदेशामुळे दोन्ही देश संवादाच्या स्थितीत
► वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांना अभिनंदन आणि शुभेच्छा यांचा संदेश देणारा दूरध्वनी केला आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवार आणि बुधवारच्या रात्री अकरा वाजता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 75 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांच्या ‘सोशल ट्रूथ’ या माध्यमावरही एक शुभसंदेश प्रसारित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या संदेशाला तितकाच उत्कट प्रतिसाद देणारा संदेश प्रसारित केल्याने दोन्ही देशांमध्ये पुन्हा मधुर संबंध प्रस्थापित होण्याची शक्यता वाढली आहे. अनेक राजकीय तज्ञांनीही या संवादाचा असाच अर्थ लावला आहे.
दोन्ही नेत्यांमध्ये 90 दिवसांच्या अंतरानंतर दूरध्वनीवरुन प्रत्यक्ष संपर्क झाला आहे. त्यामुळे ही घटना अधिकच महत्वाची आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अध्यक्ष ट्रंप यांचा हा संदेश केवळ एक औपचारिता पूर्ण करणारा नव्हता. तर भारताशी अमेरिकेच्या असणाऱ्या दृढ संबंधांना आणि धोरणात्मक भागीदारीला प्रतिबिंबित करणारा हा संदेश होता, असेही त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे.
काय आहे ट्रंप यांचा संदेश…
ट्रंप यांनी त्यांच्या संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले ‘मित्र’ असे संबोधले आहे. तसेच त्यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी भारताने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आहे. मात्र, त्यांनी व्यापार करार किंवा भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांविषयी कोणताही उल्लेख या संदेशात केलेला नाही, या बाबीकडेही अनेक तज्ञांनी लक्ष वेधले आहे. तरीही, हा संदेश केवळ औपचारिक मानता येणार नाही, असे तज्ञांचे मत आहे.
पंतप्रधान मोदी यांचा प्रतिसाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा देण्यासाठी ट्रंप यांचे आभार मानले आहेत. तसेच रशिया-युव्रेन युद्ध थांबविण्यासाठी ट्रंप करीत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली आहे. या प्रयत्नांमध्ये भारताला तुम्हाला पूर्ण पाठिंबा आहे, हे स्पष्ट करताना भारत आणि अमेरिका यांच्यातील द्विपक्षीय संबंध नव्या उंचीवर नेण्याची इच्छाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना आस्थापूर्वक पाठविलेले हे संदेश दोन्ही देशांमधील संबंध पूर्वपदावर येत असल्याचे द्योतक आहेत, असे अनेक जाणकारांचे म्हणणे आहे. तथापि, दोन्ही देश अद्याप एकमेकांपासून एका सावध अंतरावर आहेत, असाही अर्थ काहींनी काढला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या संदेशाचा अन्वयार्थ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश अधिक ‘बोलका’ असल्याचे तज्ञांचे मत आहे. अमेरिकेने भारताकडून होणाऱ्या आयातीवर 50 टक्के व्यापार शुल्क लावण्याचा निर्णय लागू केल्यानंतर भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंधांमध्ये निश्चितच एक तणाव निर्माण झाला होता. हा तणाव दूर करण्याची भारताची इच्छा आहे, हे त्यांच्या बुधवारच्या संदेशावरुन दिसून येते. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध पुन्हा पहिल्यासारखे व्हावेत, यासाठी ‘रीसेट’ बटन दाबण्यास आपण सज्ज आहोत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दर्शवून दिल्याचे दिसत आहे.
पुढे काय घडू शकते…
दोन्ही नेत्यांच्या बुधवारच्या संवादातून काही बाबी स्पष्ट होत आहेत. दोन्ही देश पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ इच्छित आहेत. मात्र, अद्यापही, एकमेकांसंबंधी काही संशय उरलेला आहे. तथापि, संबंधांमधील अडथळे दूर व्हावेत, यासाठी दोन्ही देश उत्सुक आहेत. अमेरिकेचे व्यापारी शिष्टमंडळ आणि भारताचे प्रतिनिधी यांच्यात व्यापार कराराविषयीच्या चर्चेला पुन्हा प्रारंभ होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाशी भारताची चर्चा मंगळवारी भारतात झाली आहे. या चर्चेसंबंधात दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे अधिकृत व्यापार चर्चेला पुन्हा प्रारंभ होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढली आहे, असे मानले जात आहे. हा व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याचीही इच्छा दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी गेल्या दोन आठवड्यांमध्ये व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारच्या संवादाकडे पाहिले जात आहे. दोन्ही देश अद्यापही एकमेकांना ‘आजमावत’ असल्याचे दिसत असले, तरी गेल्या दोन आठवड्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर पुन्हा आशादायक स्थिती निर्माण झाली आहे, असे अभ्यासक मानतात. `
दूरध्वनी चर्चेमुळे तणावात शिथीलता
ड दोन्ही नेत्यांच्या तीन महिन्यानंतरच्या थेट संवादामुळे आशादायी वातावरण
ड अमेरिकेशी संबंध सुरळीत करण्याची भारताची इच्छा स्पष्टपणे झाली व्यक्त
ड लवकरात लवकर व्यापार करार झाल्यास संबंध पुनर्स्थापित होणे निश्चित









