पंतप्रधान मोदी यांच्या आमंत्रणाचा केला स्वीकार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन हे पुढच्या वर्षाच्या पूर्वार्धात भारताचा दौरा करणार आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरुन ते भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. रशियानेही या वृत्ताला दुजोरा दिला असून त्या देशाचे प्रवक्ते युरी उशाकोव्ह यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या दौऱ्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. फेब्रुवारीत हा दौरा शक्य आहे.
प्रत्येक वर्षी एकमेकांना भेटण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या नेत्यांनी घेतला आहे. यावेळी रशियाचे अध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर जातील. आम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निमंत्रण मिळाले असून आम्ही त्याचा स्वीकार केला आहे. या निमंत्रणाला अनुसरुन अध्यक्ष व्लादिमिर पुतीन भारताचा दौरा करणार आहेत. हा दौरा पुढच्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये होऊ शकेल. रशिया या दौऱ्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पहात आहे, असे उशाकोव्ह यांनी स्पष्ट केले.
ऑक्टोबरमध्ये निमंत्रण
गेल्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील कझान येथे आयोजित बिक्स परिषदेच्या निमित्ताने रशियाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी पुतिन यांच्याशी एकास एक चर्चा केली होती. या चर्चेच्या वेळी त्यांनी पुतिन यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले होते. पुतिन यांच्या दौऱ्यात भारत आणि रशिया यांच्यातील 23 व्या शिखर परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे.
22 वर्षांची परंपरा
भारत आणि रशिया यांच्या प्रमुख नेत्यांनी प्रत्येक वर्षी एकमेकांना भेटण्याचा निर्णय 22 वर्षांपूर्वी घेतला होता. तेव्हापासून आजवर प्रत्येक वर्षी आलटून पालटून भारतात आणि रशियात दोन्ही देशांचे प्रमुख नेते एकमेकांना भेटतात. शिखर परिषदेचे आयोजन केले जाते. पुढच्या वर्षी, अर्थात 2025 मध्ये अशा 23 व्या शिखर परिषदेचे आयोजन भारतात करण्यात येणार आहे.
द्विपक्षीय संबंधांवर चर्चा
ऑक्टोबरमध्ये कझान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्लादिमिर पुतीन यांच्यात झालेल्या शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधांवर सकारात्मक चर्चा झाली होती. राजकीय, आर्थिक, ऊर्जाविषयक, संरक्षणविषयक तसेच लोकसंपर्कविषयक मुद्द्यांवर अनेक निर्णय घेण्यात आले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्येही रशियाचे शिष्टमंडळ भारतात आले होते. तेव्हा विविध क्षेत्रांमध्ये होत असलेल्या सहकार्याचा आढावा घेण्यात आला होता आणि हे सहकार्य अधिक दृढ करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला होता, अशी माहिती देण्यात आली.









