जन्मदिनाच्या दिल्या शुभेच्छा : पुतीन यांच्या भारत दौऱ्यासाठी उत्सुक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना 73 व्या जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत-रशियाची विशेष आणि प्रिव्हिलेज्ड स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप वृद्धींगत करण्याबद्दल प्रतिबद्धता अधोरेखित केली आहे.
पंतप्रधानांनी राष्ट्रपती पुतीन यांना त्यांच्या आरोग्य आणि सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. भारत रशियासोबत स्वत:चे द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी प्रतिबद्ध आहे आणि दोन्ही देशांदरम्यान दीर्घकाळापासून चालत आलेल्या रणनीतिक सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याची संधी शोधत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
राष्ट्रपती पुतीन यांचे भारतात स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचेही मोदींनी चर्चेदरम्यान नमूद पेले आहे. पुतीन हे भारतात आयोजित होणाऱ्या 23 व्या भारत-रशिया वार्षिक परिषदेत सहभागी होणार आहेत. ही परिषद डिसेंबर महिन्यात पार पडणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून दोन्ही देश विविध क्षेत्रांमध्ये सहकार्य आणखी विस्तारित करणे आणि रणनीतिक भागीदारीला नवी दिशा देण्याची योजना आखत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जुलै 2024 मध्ये मॉस्को दौऱ्यादरम्यान पुतीन यांना भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी आमंत्रित केले होते. पुतीन हे यापूर्वी 2021 मध्ये भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी 21 व्या वार्षिक द्विपक्षीय शिखर परिषदेत भाग घेतला होता.
तर मंगळवारी झालेल्या चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय अजेंड्याच्या प्रगतीची समीक्षा देखील केली आहे. यात व्यापार, संरक्षण, ऊर्जा, विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या दिशेवर चर्चा झाली. भारत आणि रशियादरम्यान दीर्घकाळापासून विशेष प्रिविलेज्ड रणनीतिक भागीदारी राहिलीअसून दोन्ही देश याला आणखी दृढ करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.









