झेलेन्स्की यांनी ट्विट करत दिली माहिती
वृत्तसंस्था / कीव्ह
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी फोनवरून चर्चा केली आहे. यासंबंधी माहिती युक्रेनच्या अध्यक्षांनी ट्विट करत दिली आहे. पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या चर्चेदरम्यान भारताला मिळालेले जी-20 चे अध्यक्षत्व यशस्वी ठरावे अशी सदिच्छा व्यक्त केल्याचे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
जी-20 च्या व्यासपीठावरच मी शांतता फॉर्म्युल्याची घोषणा केली होती, हा फॉर्म्युला यशस्वी होण्यात भारताची भागीदारी राहील असा विश्वास आहे. संयुक्त राष्ट्रसंघात मानवी सहाय्य आणि समर्थनासाठी भारताचे आभार मानल्याचे झेलेन्स्की यांनी नमूद पेले आहे.
युक्रेन-रशिया यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत झेलेन्स्की यांनी केलेली चर्चा महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान मोदींनी झेलेन्स्की यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. त्या चर्चेदरम्यान मोदींनी झेलेन्स्की यांना लवकरात लवकर युद्ध संपविण्याचे आवाहन केले होते. कुठल्याही संघर्षावर सैन्य तोडगा ठरू शकत नसल्याचे मोदींनी म्हटले होते.
शत्रुत्व संपवत चर्चेच्या आधारावर कूटनीतिच्या मार्गावर पावले टाकावीत. युक्रेनसह अन्य सर्व आण्विक प्रकल्पांच्या सुरक्षेला भारत महत्त्व देतो. शांततेच्या सर्व शक्य असलेल्या प्रयत्नांमध्ये योगदानासाठी भारत पूर्णपणे तयार असल्याचे मोदींनी म्हटले हेते.
युक्रेनमधील युद्ध समाप्त करण्याच्या दृष्टीकोनातून रशिया चर्चेसाठी तयार असल्याचा दावा रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी रविवारी केला होता. युक्रेन सैन्य मोहिमेसंबंधी योग्य तोडगा इच्छिणाऱया सर्वांसोबत चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही नव्हे तर युक्रेनच तोडग्याला नकार देत आहे. आम्ही आमच्या राष्ट्रीय आणि नागरिकांच्या हितांच्या रक्षणासाठी प्रयत्नशील आहोत असे उद्गार पुतीन यांनी काढले आहेत.









