वार्ताहर /नंदगड
खानापूर डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. ज्ञानेश्वर नाडगौडा, सेक्रेटरीपदी डॉ. सागर नार्वेकर, खजिनदार डॉ. किरण लाड यांची एकमताने निवड करण्यात आली. पदाधिकारी निवड बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ डॉक्टर सुदर्शन सुळकर होते. यावेळी डॉक्टर असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील, मावळते सेक्रेटरी डॉ. राम पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांकडे पदभार सुपूर्द केला. यावेळी असोसिएशनचे डॉ. राधाकृष्ण हेरवाडेकर, डॉ. सुनील शेट्टी, डॉ. मदन कुंभार, डॉ. विनायक पाटील, डॉ. सागर चिठ्ठी, डॉ. शंकर पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. वैभव भालकेकर व अन्य सदस्य उपस्थित होते.
नूतन अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर नाडगौडा याप्रसंगी म्हणाले, डॉक्टर हा समाजातील चांगला घटक म्हणून ओळखला जातो. समाजात राहण्यासाठी चांगल वागणे, दर्जेदार राहणे त्याचे कर्तव्य आहे. खानापुरातील डॉक्टर अल्पदरातील शुल्कामध्ये रुग्णांची सेवा करण्यासाठी तयार आहेत. पण डॉक्टरांच्याबद्दल समाजात जो गैरसमज पसरला आहे, तो दूर होणे गरजेचे आहे. समाजाने एमबीबीएस डॉक्टरानाच मानसन्मान देण्याबरोबरच बी. एच. एम. एस., बी. ए. एम. एस. पदवीप्राप्त डॉक्टरांनाही तितकाच मानसन्मान देणे गरजेचे आहे. त्यांचा राजकीय व्यक्ती व सरकारने सन्मान ठेवणे कर्तव्य आहे. खानापुरातील डॉक्टरांनी आपल्यावर विश्वास ठेवून आपली अध्यक्षपदी निवड केली. त्या विश्वासाला पात्र राहून डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्याचे आश्वासन नाडगौडा यांनी दिले. डॉक्टर असोसिएशनचे मावळते अध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांनी 1992 सालापासून खानापुरात डॉक्टर असोसिएशन अस्तित्वात आहे. या असोसिएशनमार्फत समाजोपयोगी विविध कार्यक्रम राबविण्याबाबत व असोसिएशनच्या कार्याबद्दल सविस्तर आढावा मांडला.









