नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुऊवारी राष्ट्रपती भवनात खेळाडूंसोबत झालेल्या बैठकीत विश्वचषक विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाचे उत्कृष्ट कामगिरीबद्दल कौतुक केले. यावेळी संपूर्ण संघाने स्वाक्षरी केलेली जर्सी त्यांना भेट देण्यात आली. रविवारी नवी मुंबईत झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा 52 धावांनी पराभव करून भारताने महिला क्रिकेटमध्ये पहिले जागतिक विजेतेपद पटकावले होते. राष्ट्रपती मुर्मू यांनी संघाचे ऐतिहासिक यशाबद्दल अभिनंदन केले आणि म्हटले की, खेळाडूंनी केवळ इतिहास रचलेला नाही, तर त्या तऊण पिढीसाठी आदर्श देखील बनल्या आहेत. आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक 2025 च्या विजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या सदस्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. राष्ट्रपतींनी यावेळी सांगितले की, हा संघ भारताचे प्रतिबिंब आहे. खेळाडू वेगवेगळ्या प्रदेशांचे, वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमीचे आणि वेगवेगळ्या परिस्थितींचे प्रतिनिधीत्व करतात. पण संघ म्हणून ते एक आहेत-भारत, असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींच्या अधिकृत हँडल ‘एक्स’वर या भेटीची छायाचित्रे पोस्ट करण्यात आली. या संवादादरम्यान भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने राष्ट्रपतींना विश्वचषक आणि स्वाक्षरी केलेली जर्सीही सादर केली. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने जारी केलेल्या निवेदनानुसार राष्ट्रपतींनी भारत सर्वोत्कृष्ट असल्याचे या संघाने दाखवून दिले असल्याचेही यावेळी म्हटले. मुर्मू म्हणाल्या की, सात वेळच्या विश्वविजेत्या आणि तोवर अपराजित राहिलेल्या ऑस्ट्रेलियन संघाला उपांत्य फेरीत पराभूत करून संघाने सर्व भारतीयांचा त्यांच्या क्षमतेवरील विश्वास बळकट केला. यामुळे तऊण पिढी, विशेषत: मुली, जीवनात पुढे जाण्यासाठी प्रेरित होतील. भविष्यातही महिला खेळाडू भारतीय क्रिकेटला अव्वल स्थानावर ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साखळी टप्प्यात सलग तीन पराभवांनंतर मोहिमेदरम्यान संघाला सामोरे जावे लागलेल्या आशा आणि निराशेच्या चढ-उतारांची राष्ट्रपतींनी नोंद घेतली. कधी कधी त्यांची झोपही उडून गेली असेल, पण त्यांनी सर्व आव्हानांवर मात केली, असे त्या म्हणाल्या. न्यूझीलंडवरील विजयानंतर लोकांना विश्वास वाटला की, सामन्यात परिस्थितीने हेलकावे खाऊनही आमच्या मुलीच जिंकतील, असेही मुर्मू यांनी सांगितले. संघाने यापूर्वी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.









