प्रतिनिधी / पणजी
तीन दिवसांचा गोवा दौरा आटोपून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी सायंकाळी दिल्लीस प्रयाण केले. तत्पूर्वी त्यांनी राज्यातील जागतिक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी दिल्या.
राष्ट्रपतींनी गुरुवार दि. 24 रोजी सकाळी प्रथम जुने गोवे येथील बाँ जिझस बासिलिका चर्चला भेट दिली. त्यानंतर कवळे येथील श्रीशांतादुर्गा मंदिरात जाऊन त्यांनी देवीचे आशीर्वाद घेतले. तेथून त्यांनी वेर्णा येथील महालसा मंदिरालाही भेट दिली व नंतर त्यांनी दाबोळी विमानतळाकडे प्रयाण केले आणि तेथून दिल्लीला निघाल्या.
जुने गोवेतील बेसिलिका चर्च परिसराला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून प्रमाणित केले आहे. राष्ट्रपती सकाळी 10.30 वाजता बाँ जिझस बासिलिका चर्चमध्ये दाखल झाल्या. त्यांनी तेथील परिसराची पाहणी केली. तसेच त्या स्थळाचे ऐतिहासिक महत्त्व आणि स्थापत्यशास्त्र याबद्दल अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. श्रीमती मुर्मू यांनी त्यानंतर फोंडा तालुक्यातील कवळे येथे श्रीशांतादुर्गा आणि वेर्णा येथील श्रीमहालसा या मंदिरांनाही भेट देऊन देवदर्शन घेतले.
मंगळवारी गोव्यात दाखल झालेल्या राष्ट्रपतींनी दुपारी आझाद मैदानावर हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. त्यानंतर सायंकाळी त्यांच्यासाठी राजभवनात नागरी स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. बुधवारी त्यांनी राजभवनातील दरबार सभागृहात गोवा विद्यापीठाच्या 34व्या दीक्षांत सोहळ्यात उपस्थिती लावून विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या. त्यानंतर दुपारी त्यांनी राज्य विधानसभेत विशेष अधिवेशनाला संबोधित केले. गुऊवारी राज्यातील जागतिक महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना भेटी देऊन राष्ट्रपतींनी दिल्लीस प्रयाण केले.









