वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता सात दिवसांचा कॅरेबियन देशांचा दौरा करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रपती कार्यालयातून देण्यात आली आहे. कॅरेबियन देशांना भेट देणारे ते भारताचे पहिले राष्ट्रपती ठरतील. या दौऱयात ते जमैका आणि सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडा या देशांना भेट देतील. ते जमैका देशाच्या संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर भाषण करणार आहेत.
या दौऱयात ते वेस्ट इंडिजच्या क्रिकेट संघातून खेळणाऱया जमैकाच्या खेळाडूंचीही भेट घेणार आहेत. या खेळाडूंना त्यांच्याकडून क्रिकेटची साधने भेट दिली जाणार आहेत. राष्ट्रपतींसह या दौऱयात केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि खासदार सतीशकुमार गौतम व रमादेवी यांचाही समावेश आहे.









