मंदारिन भाषा, चिनी समाजवाद अन् वांशिक एकतेचा पुरस्कार : तिबेटची राजधानी ल्हासा येथे पोहोचले चीनचे अध्यक्ष
वृत्तसंस्था/ल्हासा
तिबेटी बौद्ध धर्माचे सर्वात पवित्र स्थळ ल्हासा येथे पोहोचून चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी भू-राजकीय संदेश दिला आहे. या दौऱ्यात त्यांनी तिबेटच्या क्षेत्रीय, सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखीच्या विरुद्ध चीनच्या अजेंड्याला या पवित्र शहरावर लादण्याची घोषणा केली आहे. अध्यक्ष जिनपिंग यांचा दौरा तिबेटी संस्कृतीला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या नियंत्रणात एकीकृत करण्याच्या रणनीतिचा हिस्सा आहे. क्षी जिनपिंग यांनी ल्हासा येथे कम्युनिस्ट पक्षाच्या कॅडर्सना भाषेच्या स्वरुपात मंदारिनच्या वापराला बळ देण्याचा निर्देश दिला. परंतु या क्षेत्रातील भाषा तिबेटी असून ती तिबेटी लिपीत लिहिली जाते. परंतु जिनपिंग यांनी येथे चिनी मुख्यभूमीची भाषा मंदारिनच्या वापरावर जोर दिला आहे.
तिबेटी बौद्ध धर्माला चिनी मॉडेलच्या समाजवादासोबत जोडण्याचे काम करण्याची सूचना कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना जिनपिंग यांनी केली आहे. तिबेटला आधुनिक समाजवादी तिबेट करण्यावर त्यांनी जोर दिला. याचबरोबर स्थानिक कार्यकर्त्यांना वांशिक एकतेत सुधाराला प्रदर्शित करण्यासाठी विशेष जिल्हेही स्थापन करण्याचा आदेश दिला. तिबेटवर शासन करणे आणि त्याचा विकास करण्यासाठी सर्वप्रथम राजकीय आणि सामाजिक स्थिरता सुनिश्चित करावी लागेल. तसेच वांशिक एकता आणि धार्मिक लोकांचे समाजासोबत सामंजस्य निर्धारित करावे लागणार असल्याचे म्हणत जिनपिंग यांनी तिबेटवरील चीन सरकारची पोलादी मूठ आवळली आहे.
तिबेटचा दौरा का
चीनचे अध्यक्ष जिनपिंग हे स्वत:च्या 12 वर्षांच्या कार्यकाळात तिबेटमध्ये दुसऱ्यांदा पोहोचले आहेत. चीनने दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्याच्या प्रक्रियेला मानण्यास नकार दिला असताना हा त्यांचा दौरा झाला आहे. चीनने 1950 साली तिबेटवर कब्जा केला होता, यानंतर 1965 मध्ये चीनने याला तिबेट स्वायत्त क्षेत्रात बदलत यावर शासन करण्यास सुरुवात केली होती. चीनने 1950 मध्ये तिबेटवर कब्जा केल्यावर तेथील बौद्धांवर अत्याचार सुरू झाले होते. अशास्थितीत तिबेटी अध्यात्मिक नेते दलाई लामा हे तिबेटींच्या मोठ्या समुहासह 1959 मध्ये भारतात दाखल झाले होते. चीन यंदा तिबेट स्वायत्त क्षेत्राच्या स्थापनेला 60 वर्षे झाल्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करत आहे. याचनुसार जिनपिंग हे तिबेटमध्ये दाखल झाले आहेत.
स्वत:ची पकड मजबूत करणार
अलिकडच्या वर्षांमध्ये चीनने तिबेटवरील स्वत:ची पकड मजबूत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तिबेट स्वायत्त क्षेत्राच्या निर्मितीला 60 वर्षे झाली असली तरीही चीनचे दोनच अध्यक्ष तेथे आले आहेत. यात क्षी जिनपिंग स्वत: तेथे दोनवेळा पोहोचले आहेत. यापूर्वी 1990 मध्ये तत्कालीन अध्यक्ष जियांग जेमिन यांनी तिबेटचा दौरा केला होता.
चीनच्या दडपशाहीला विरोध
तिबेटच्या भौगोलिक रचनेमुळे याला आशियाची छत्री मानले जाते. तिबेटला चीनमध्ये जियांग असे संबोधिण्यात येते. हा प्रदेश चीनची सत्ता आणि राजकीय अजेंड्याच्या केंद्रस्थानी राहिला आहे. 1950 च्या दशकात कब्जा केल्यापासूनच चीन याला स्वत:चा अविभाज्य घटक मानतो. परंतु तिबेटी लोक चीनचा हा दावा नाकारतात आणि याला स्वायत्त क्षेत्र संबोधितात. चीनच्या दडपशाही आणि सांस्कृतिक हस्तक्षेपाला ते विरोध करत आहेत.
तिबेटच्या संघटनांचा विरोध
तिबेटच्या स्वायत्ततेची मागणी करणाऱ्या संघटनांनी जिनपिंग यांच्या ल्हासा दौऱ्याला विरोध दर्शविला आहे. क्षी जिनपिंग यांच्या मागील 5 वर्षांमधील दुसऱ्या दौऱ्यामुळे तिबेटमध्ये सर्वकाही सुरळीत नसल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा तिबेट इन वॉशिंग्टन नावाच्या संस्थेचे प्रतिनिधी नामग्याल चोडेप यांनी केला. चीनकडून तिबेटमध्ये प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवली जात आहे. जिनपिंग यांच्याकडे तिबेटमधील स्वत:च्या उपस्थितीवरून ऐतिहासिक अणि लोकप्रिय दोन्ही प्रकारच्या वैधतेचा अभाव असल्याचे या संघटनेने म्हटले आहे.









