संगमावर देशवासियांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करणार
वृत्तसंस्था/ प्रयागराज
देशाच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सोमवारी प्रयागराजच्या पवित्र भूमीवर पाऊल ठेवत महाकुंभमेळ्याला उपस्थिती दर्शवतील. या दौऱ्यात त्या प्रयागराजमध्ये आठ तासांपेक्षा जास्त काळ राहणार आहेत. संगमात स्नान करण्यासोबतच अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरातही त्या दर्शन घेऊन पूजा करतील. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्यासोबत उपस्थित राहणार आहेत.
प्रयागराजच्या पवित्र भूमीत त्या देशवासियांच्या सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करणार आहेत. राष्ट्रपतींची ही भेट केवळ प्रयागराजसाठी ऐतिहासिक नसून देशभरातील भाविकांसाठी एक प्रेरणादायी क्षण असेल. त्यांच्या उपस्थितीमुळे महाकुंभाच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्वाला एक नवीन उंची मिळेल. राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
राष्ट्रपती मुर्मू सकाळी संगम नाक्यावर पोहोचतील आणि त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करतील. देशातील प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपतींचे संगमातील पवित्र स्नान हा एक ऐतिहासिक क्षण असेल. याआधी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीही महाकुंभात पवित्र स्नान केले होते.









