साडेसात वर्षांत दुसऱ्यांदा खानापूर अध्यक्ष-उपाध्यक्षांची निवड
खानापूर : खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक सोमवार दि. 27 रोजी पार पडली. नगराध्यक्षपदी मिनाक्षी बैलूरकर तर उपनगराध्यक्षपदी जया भुतकी यांची बिनविरोध निवड झाली. खानापूरचे तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. गेल्या साडेसात वर्षांत दुसऱ्यांदा नगरसेवकांना प्रशासकीय कारभारातून सुटका होऊन पुन्हा नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाल्याने नगरसेवकांत उत्साहाचे वातावरण होते. खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षपदाची निवडणूक दोन वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळानंतर ऑगस्ट 2024 मध्ये होणार होती.
मात्र नगरसेवक लक्ष्मण मादार यांनी आरक्षणाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे पाच महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिल्याने 27 जानेवारी रोजी निवडणूक घेण्यात आली. गेल्या सहा महिन्यांपासून नगरसेवक प्रकाश बैलूरकर यांनी आपल्या पत्नी मिनाक्षी बैलूरकर यांच्यासाठी मोर्चेबांधणी केली होती. यावेळी 20 पैकी 14 नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित झाले होते. मात्र ऐनवेळी उच्च न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्याने निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दोन्ही पदे सामान्य महिलांसाठी राखीव असल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू होती.
मात्र जया भुतकी यांच्या नावाला नगरसेकांनी पाठिंबा दिल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली. दुपारी 1 वा. अर्ज करण्याची वेळ होती. यावेळी फक्त मिनाक्षी बैलूरकर आणि जया भुतकी या दोघींचे अर्ज दाखल झाले होते. मात्र निवडणुकीच्या वेळेनुसार तीननंतर निवडणूक अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी नूतन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना शुभेच्छा दिल्या. येथील शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवाजी पुतळ्याला, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला, बसवेश्वर पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन केले.









