खानापूर : पर्यावरण जपणं ही जबाबदारी नाही तर जीवनशैली असायला हवी, असे प्रतिपादन शिवाजी कागणीकर यांनी येथील म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयात जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अरविंद पाटील होते. व्यासपीठावर संचालक शिवाजी पाटील, मुख्याध्यापक राहूल जाधव उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या वसुंधरा गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
सुरुवातीला नाथाजीराव हलगेकर आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. शिवाजी कागणीकर पुढे म्हणाले, सागरी प्रदूषण, वाढती लोकसंख्या नियंत्रण, ग्लोबल वार्मिंग, वन्यजीव रक्षण आणि संवर्धन ही आम्हा सर्वांची जबाबदारी आहे. आज प्रत्येक क्षेत्रात विज्ञानाच्या प्रगतीचा डंका आपण वाजवतो आहोत. विज्ञानाच्या प्रगतीबरोबर माणसांची हावरट लालसा जन्माला आली, आणि याच लालसेपोटी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अंदाधुंद वापर होतो आहे.
त्यामुळे चंद्रावर पोहचलेल्या माणसाचा पाया डळमळीत झाला आहे. आज विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणासाठी छोटे एक पाऊल उचलून मोठा बदल घडवून आणला पाहिजे. प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे, एक तरी झाड लावलं पाहिजे आणि पाणीही वाचवलं पाहिजे. भविष्यातील आनंदी जीवनासाठी पर्यावरण रक्षण महत्त्वाचे आहे. निसर्गाचा पर्यावरणाशी, पर्यावरणाचा निसर्गाशी आणि निसर्गाचा मानवाच्या जीवनाशी घनिष्ट संबंध आहे.
खरंतर सूर्य उगवतो ही दिनाची सुरुवात असते आणि झाड उगवते ती सुदिनाची नांदी असते. वनिकरणाचा सेतू बांधण्यासाठी शासन आणि सामाजिक संघटना आता चांगली पावलं उचलताना दिसत आहेत. याच सेतू बांधनित माझाही एक दगड (एक झाड) असला पाहिजे. अशी प्रत्येक विद्यार्थ्याची ओढ असली पाहिजे, असे ते म्हणाले. प्राचार्य अरविंद पाटील यांनी वसुंधरेच्या शालूला हिरवा रंग लावूया आणि बहरलेल्या सृष्टीच्या अंतरंगात मनसोक्त न्हाऊया… या काव्य पंक्तीतील ओळीवर भर देताना, विद्यार्थिनीना पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. सूत्रसंचालन प्रा. टी. आर. जाधव यांनी केले व पाहुण्यांची ओळख प्रा. आरती नाईक यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. सोनल पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.









