गोवा राज्य म्हटले म्हणजे जणू उत्सवांची मांदियाळी. गोवा राज्य केवळ समुद्रकिनाऱयांमुळेच नव्हे तर येथील विलोभनीय मंदिरांमुळेही प्रसिद्ध आहे. या राज्यात वर्षाचे बाराही महिने विविधांगी कार्यक्रमांची रेलचेल असते. गोवा हे पर्यटन स्थळ म्हणून जगभरात प्रसिद्ध आहे. गोव्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. विलक्षण सौंदर्यामुळेच गोवा जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे.
गोवा राज्याला ‘सुंदर शोबित राज्य’ (भांगराळे गोंय) म्हणून उपमा दिली जाते. एकंदरीत गोवा राज्य अनेकांना भावते. राज्यातील समुद्रकिनाऱयांवरील फेसाळत्या लाटा अंगावर झेलण्यासाठी व येथील आल्हाददायक निसर्गसौंदर्य न्याहाळण्यासाठी पर्यटक गोव्यात येण्यासाठी आसुसलेला असतो. गोव्यातील समुद्रकिनाऱयांबरोबरच येथील मंदिरे तसेच चर्चेसही पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. राजधानी पणजीत तर पर्यटकांची लगबग असते. मिरामार समुद्रकिनारी जाणारा देशी-विदेशी पर्यटक कांपाल येथील दर्यासंगमावर असलेल्या कला अकादमी या सांस्कृतिक वैभव जपणाऱया वास्तुला निश्चितच भेट देतो. एकीकडे दर्यासंगमच्या लाटांचा गाज व त्यात उभी असलेली वास्तू पाहून अनेकांचे मन प्रसन्न होते. या कला अकादमीमध्ये अनेकविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. स्थानिक तसेच महाराष्ट्रातील विविध नाटकांची मेजवानी नाटय़रसिकांना लाभते. विविध प्रदर्शने याठिकाणी भरविली जातात. कला अकादमीतील कार्यक्रम पाहून रसिकवर्ग तृप्त होतो. कला अकादमी ही वास्तू खऱया अर्थाने वास्तूशिल्प कलेचा उत्कृष्ट नमुना आहे. अनेकजण विरंगुळय़ासाठी या वास्तूला सकाळ-संध्याकाळ भेटी देत असतात.
राज्य सरकारने कला अकादमीच्या वास्तुचे नूतनीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे याठिकाणी होणाऱया अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांना तसेच विविध प्रदर्शनांना खो बसलेला आहे. यामुळे कलारसिक हिरमुसला आहे. पेडण्यापासून काणकोणपर्यंतचा कलारसिक या वास्तुशी जोडला गेलेला आहे. या वास्तुच्या मूळ ढाच्याला कुठलीही बाधा न पोहोचविता ही वास्तू पुन्हा उभी राहावी, अशी अपेक्षा कला रसिकांची अर्थात समस्त गोमंतकीयांची आहे. या वास्तुत पावसाचे पाणी शिरू नये यासाठी केवळ प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असताना पूर्ण नूतनीकरणाचे काम हाती घेतल्यामुळे सरकारवर विरोधी पक्षातर्फे टीका होत आहे. ही केवळ मलई लाटण्याची चाल असल्याची भावना विरोधी पक्षामध्ये तसेच सर्वसामान्य गोमंतकीयांमध्येही आहे. राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी या कला अकादमीच्या नूतनीकरणाचा अहवाल समस्त गोमंतकीयांसमोर मांडणे हितावह ठरेल. या कारभारात पारदर्शकता असावी, अशी समस्त जनतेची मागणी आहे.
चार्लस् कुरैय्या फाऊंडेशनने तसेच आप पक्षाने कला अकादमीच्या नूतनीकरणाबद्दल पत्रकार परिषदेत बरेच गंभीर आरोप केले. कला अकादमीच्या मूळ वास्तुच्या बांधकामात कोणताच फेरफार वा बदल करण्यात आलेला नाही तर नूतनीकरण करण्यात येत आहे. सर्व बांधकाम पारदर्शक असून ते वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बांधकाम समाधानकारक असून ऑगस्टअखेर लोकार्पण करण्यासाठी कंत्राटदाराला काम पूर्ण करण्याची डेडलाईन देण्यात आली आहे. पावसाची स्थिती व तांत्रिक अडचणी यावरही ते अवलंबून आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कला अकादमीच्या बांधकामावरून विरोधक तसेच चार्लस् कुरैय्या फाऊंडेशनने केलेल्या आरोपांचे मंत्री गोविंद गावडे यांनी खंडन करण्यासाठी तसेच बांधकामाची माहिती देण्यासाठी पत्रकारांना घटनास्थळी प्रत्यक्षात नेले व त्यात काही गैर असल्यास त्याबाबत माहिती देतो, असे स्पष्ट सांगितले. आतापर्यंत सुमारे 60 टक्के काम पूर्ण झाले आहे व उर्वरित 40 टक्के काम महत्त्वाचे आहे. राज्यात पाऊस मोठय़ा प्रमाणात पडत असल्याने त्याचा व्यत्यय कामात येऊ शकतो. हे नूतनीकरणाचे काम सर्व बाजूने पत्रे लावून सुरू असल्याचा आरोप केला जात आहे मात्र सुरक्षिततेच्यादृष्टीने ते लावण्यात आले असून त्यात काहीच गैरकाम सुरू नसल्याचे मंत्री गावडे यांचे म्हणणे आहे. एकंदरित या वास्तुसंबंधी केवळ पत्रकारांना माहिती देऊन गैरसमज दूर होणार नाहीत तर या नूतनीकरणाचा अहवाल गोमंतकीय जनतेच्या दरबारात ठेवणे आवश्यक ठरते.
कला अकादमीतर्फे दरवर्षी मनोहरबुवा शिरगावकर स्मृती भजनी स्पर्धा घेण्यात येते. ही स्पर्धा प्रथम तालुकास्तरावर विभागीय गटात घेतली जाते व या गटांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त भजनी पथके राज्यस्तरीय भजन स्पर्धेसाठी पात्र ठरतात. 15 ऑगस्ट रोजी कला अकादमीमध्ये या पथकांची भजने सादर होतात. जणू कला अकादमीला पंढरपूरमय स्वरुप प्राप्त होते. कोरोनामुळे मध्यंतरी या स्पर्धेला ब्रेक लागला होता. ही स्पर्धा कला अकादमीच्या वास्तुतच व्हावी, अशी अनेक पथकांची इच्छा आहे. नूतनीकरणाच्या कामाची डेडलाईन ऑगस्ट महिना असला तरी तोपर्यंत हे काम पूर्ण होईल का, याबाबत साशंकता आहे. सदर स्पर्धेच्या निमित्ताने तरी कला अकादमीचे काम नेटाने होणे आवश्यक आहे.
एकूणच कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम सध्या वादाच्या भोवऱयात आहे. नूतनीकरण होत असलेल्या कला अकादमीची अनोखी वास्तुशैली कायम राहावी, अशी गोमंतकीयांची इच्छा आहे. कुठलेही गालबोट न लावता या वास्तुचे लोकार्पण होणे आवश्यक आहे. या नूतनीकरणासंदर्भात विरोधी पक्षांचा सरकारवर अंकुश असणे आवश्यकच ठरते. ही कला अकादमीची वास्तू जणू नक्षत्रांचे देणे आहे. नूतनीकरणाच्या नावाखाली तिच्या रचनेला धक्का न लावता गोव्याची ही शान जपावी, असे सूचवावेसे वाटते.
राजेश परब








