सांगरूळ :
महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेचे वैभव असलेल्या ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान आणि परिसराची स्वच्छता तातडीने करावी, अन्यथा महापालिकेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाने दिला आहे.कुस्ती-मल्लविद्या महासंघाचे जिल्हा पदाधिकाऱ्यांनी खासबाग कुस्ती मैदानात एकत्र येत बैठक घेतली. यानंतर महानगरपालिकेच्या इस्टेट विभागाला निवेदन देऊन इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे खासबाग मैदान हे कुस्तीगीरांसाठी पवित्र भूमी आहे. मात्र, सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मैदान आणि त्याच्या परिसरात अस्वच्छता, कच्रयाचा ढीग, असुविधा दिसून येत आहेत. हा प्रकार कुस्ती क्षेत्रासाठी अपमानास्पद असून, महापालिकेने तातडीने मैदानाची स्वच्छता आणि देखभाल दुरुस्ती करावी. दोन वर्षांपूर्वी पडलेली भिंत अद्यापही दुरुस्त केलेली नाही . राजर्षी शाहू महाराजांनी 1912 ला रोमच्या रोम येथील मैदानाच्या धर्तीवर खासबाग मैदान बांधले असून, येथे अनेक नामवंत कुस्तीगीरांनी आपल्या खेळाचा ठसा उमटवला आहे. मैदानाच्या अस्वच्छतेमुळे स्थानिक मल्ल आणि कुस्तीप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे. प्रशासनाने तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून मैदानाची निगा राखावी .जर हा प्रश्न गांभीर्याने घेतला गेला नाही, तर कुस्ती मल्लविद्या महासंघ तीव्र आंदोलन छेडेल आणि कुस्तीगीरांसह नागरिक रस्त्यावर उतरवून महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वस्ताद बाबाराजे महाडिक पैलवान दत्तात्रय ठाणेकर उमेश पवार दिलीप माणगावे आदी कुस्ती मल्लविद्या महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते .
- आखाड्यातील लाल माती दिसावी
कुस्तीगीर व कुस्तीप्रेमी यांच्यासाठी आखाड्यातील लाल माती हे दैवत आहे .मैदानात प्रवेश केल्यानंतर आखाड्यातील लाल मातीचे दर्शन होताच अंगात चैतन्य निर्माण होते .सध्या आखाड्यातच गवत वाढल्याने आखाडा हिरवागार झाला आहे . त्याची साफसफाई होऊन आकडा नेहमी लाल दिसेल याची दक्षता घ्यावी .मैदानात कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करावा.
- कोल्हापूरची अस्मिता जतन व्हावी
राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान कोल्हापूरकरांना छत्रपती शाहू महाराजांनी दिलेली महान देणगी आहे .जगप्रसिद्ध अशा या मैदानाची सध्या झालेली दुरावस्था ही लाजिरवाणी असून महापालिका प्रशासनाने यामधील लक्ष घालून मैदानाची अस्मिता टिकवावी.
-पै उमेश पवार








