मंत्री रवी नाईक यांचे आवाहन : फर्मागुडीत जागतिक पर्यावरणदिन साजरा
प्रतिनिधी /फोंडा
पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अधिकाधिक झाडे लावतानाच, प्रत्येकाला पर्यावरणाविषयी अधिक सजग व संवेदनशील व्हावे लागेल. पर्यावरणाचे महत्व आता नवीन पिढीलाही पटू लागले आहे. पुढील पिढीसाठी पर्यावरण सांभाळून ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे असे आवाहन कृषीमंत्री रवी नाईक यांनी केले. वनखात्यातर्फे फर्मागुडी येथील पीईएस संस्थेच्या राजाराम व ताराबाई बांदेकर फार्मसी महाविद्यालयात आयोजित केलेल्या जगतिक पर्यावरणदिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
उत्तर गोवा वन विभाग व फोंडा रेंजच्या सहकार्याने फार्मसी महाविद्यालयाच्या आवारात मंत्री रवी नाईक यांच्याहस्ते विविध प्रकारची फळ व फुलझाडे लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. यावेळी पीईएस संस्थेचे पदाधिकारी किशोर नाईक, प्रकाश बाळवे, प्राचार्य डॉ. एस. एन. म्हामले देसाई, वनसंरक्षक जोसेफ फर्नांडिस, मोहनलाल फडते, उपवनसंरक्षक प्रज्योत नाईक, रेंज फॉरेस्टर जॉन फर्नांडिस व वनखात्याचे इतर कर्मचारी उपस्थित होते. पर्यावरणाशिवाय माणूस चांगल्या पद्धतीने जगू शकणार नाही. कुठल्याही कारणास्तव एखादे झाड तोडावे लागल्यास त्याची भरपाई म्हणून तीन झाडे लावा असा संदेश मंत्री रवी नाईक यांनी यावेळी दिला.
पर्यावरणात आज अनेक गोष्टी बाधा आणीत असून प्लास्टीक हा घटक त्यासाठी सर्वाधिक घातक ठरत आहे. मातीपासून पाण्यापर्यंत सर्वत्र प्लास्टीकपासून निर्माण होणाऱया प्रदूषणाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाच्या जतनासाठी जबाबदारीने वागतानाच स्वतःचे योगदान देण्याचे आवाहन जोसेफ फर्नांडिस यांनी केले. जागतिक तापमान वाढीमुळे हल्ली वादळांची मालिका सुरु झाली असून गेल्या वर्षभरात गोव्यासह देशातील अन्य किनारी भागांना मोठय़ाप्रमाणात वादळे धडकली आहेत. हे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवड करुन पर्यावरण संतुलीत राखण्यासाठी हातभार लावावा, असे प्राचार्य म्हामले देसाई म्हणाले.









