नौदलाच्या कमांडर्स परिषदेला प्रारंभ : 2 हजार वर्षे जुने भारतीय तंत्रज्ञान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय नौदलाच्या वरिष्ठ कमांडर्सची तीन दिवसीय परिषद सुरू झाली आहे. नौदलाच्या कमांडर्सच्या या परिषदेदरम्यान भारताच्या 2 हजार वर्षे जुन्या जहाजबांधणी कलेवर आधारित शिप मॉडेल देखील सादर करण्यात आले. या तंत्रज्ञानाद्वारे लाकडी पट्ट्यांना खिळ्यांद्वारे नव्हे तर परस्परांमध्ये बांधून जहाज तयार केले जात होते. या तंत्रज्ञानाद्वारे तयार जहाजांना सध्या प्राचीन भारतीय स्टिच्ड शिप म्हटले जाते.
2000 वर्षे जुन्या जहाजबांधणी तंत्रज्ञानाला पुनर्जीवित करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. याचमुळे प्राचीन भारतीय जहाजाचे मॉडेल भारतीय नौदलाच्या कमांडर्स परिषदेत सादर करण्यात आले. 2025 पर्यंत पारंपरिक मार्गांवर या जहाजाद्वारे प्रवास करण्याचे भारतीय नौदलाचे लक्ष्य आहे. प्राचीन काळात अशाप्रकारच्या जहाजांच्या माध्यमातूनच सागरी प्रवास केला जात होता.
संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट, सीडीएस जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरि कुमार यांच्या उपस्थितीत नौदल कमांडर्सच्या परिषदेत ‘ प्राचीन स्टिच्ड शिप’चे मॉडेल सादर करण्यात आले. संस्कृती मंत्रालय आणि भारतीय नौदलाने जहाजांच्या निर्मितीचे 2 हजार वर्षे तंत्रज्ञान पुनर्जीवित करणे आणि संरक्षित करण्यासाठी हातमिळवणी केली आहे.
या तंत्रज्ञानाला ‘टंकाई’ म्हटले जाते. या कलेला पुनर्जीवित करणे भावी पिढ्यांच्या दृष्टीकोनातून अन् सांस्कृतिक वारशांच्या संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे संस्कृती मंत्रालयाने म्हटले आहे.









