व्हेनिस फेस्टिवल गाजविणारा मराठी सिनेमा ; राजर्षी शाहू स्मारकमध्ये पाहण्याची संधी
प्रतिनिधी,कोल्हापूर
‘मान्सून वेडिंग’ या ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त स्पर्धा विभागात सहभागी होऊ शकलेल्या चित्रपटानंतर तब्बल 20 वर्षांनी एका भारतीय आणि मराठी भाषेतील चित्रपटाने या चित्रपट महोत्सवात स्थान पटकावले आणि ‘इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स’चा पुरस्कारही मिळवला. ‘कोर्ट’ चित्रपटाच्या राष्ट्रीय पातळीवरील लखलखीत यशानंतर चैतन्य ताम्हाणे या तरूण दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेल्या ‘द डिसायपल’ या मराठी चित्रपटाने हा मान संपादन केला. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न झालेला हा चित्रपट कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीमुळे उद्या बुधवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता चित्रपटरसिकांना राजर्षी शाहू स्मारक भवन येथे पाहता येणार आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताला समर्पित आयुष्य जगणाऱ्या शरद नेरूळकर याच्या आत्मशोधाची कथा म्हणजे ‘द डिसायपल’ हा चित्रपट. आपले वडील व गुरू यांनी शास्त्रीय संगीताबाबत घालून दिलेल्या सर्व परंपरा व शिस्त यांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या शरद नेरूळकर याला एक दिवस प्रश्न पडतो की आपण अशा सर्व मर्यादांसह समर्पित भावनेने संगीताची आराधना केली तरी खरोखरच आपल्याला या क्षेत्रातील जे सर्वोत्तम शिखर गाठायचे आहे ते गाठता येऊ शकते का? या प्रश्नातूनच शरद नेरूळकर याचा म्हटला तर आत्मशोधाचा हा प्रवास सुरू होतो.
भारतीय शास्त्रीय संगीताची पार्श्वभूमी असणारा हा चित्रपट असल्याने यातील संगीताची जबाबदारी खूप महत्त्वाची होती आणि ती अनिश प्रधान यांनी पेलली आहे, तर चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन व संकलन स्वतः चैतन्य ताम्हाणे यांनी केले आहे. अॅकॅडमी अॅवॉर्ड विनर मेक्सिकन दिग्दर्शकाच्या सोबत काही काळ काम केल्यानंतर ताम्हाणे यांनी केलेला हा चित्रपट असल्याने त्यात ‘कोर्ट’च्या तुलनेत पूर्ण वेगळी शैली वापरली गेली आहे. या चित्रपटातील कलाकारांमध्ये आदित्य मोडक, अरूण द्रविड, सुमित्रा भावे, दीपिका भिडे-भागवत, किरण यज्ञोपवित, अभिषेक काळे, नीता खेडकर, मकरंद मुकुंद, क्रिस्टी बॅनर्जी, प्रसाद वनारसे आदींचा समावेश आहे.









