प्रतिनिधी/ बेळगाव
मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी (निवृत्त) यांची मुलाखत डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतली होती. या मुलाखतीची चित्रफीत बुलकतर्फे किशोर काकडे यांनी सादर केली. मोहिनी या सैन्यदलात अधिकारी म्हणून काम करणाऱ्या मराठवाड्यातील पहिल्या महिला होत्या. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या मोहिनी यांचा सैन्यदलातील निवड प्रक्रिया, कठीण प्रशिक्षण तसेच सैनिकांचे नेतृत्व करतानाचा अनुभव अचंबित करणारा आहे.
काश्मीरच्या दहशतवादी भागात काम करतानाचा त्यांचा अनुभव अंगावर शहारे आणून देणारा होता. सैन्यदलातील कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी विविध उपक्रमातून स्वत:ला समाजसेवेशी जोडून घेतले. महिलांना सन्मान मिळाला पाहिजे. मग तो सैन्यात असो वा दैनंदिन जीवनात, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
शुक्रवारी लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्या संघ येथे ही चित्रफीत दाखवण्यात आली. डॉ. आनंद कुलकर्णी यांनी मेजर रोहिणी यांची घेतलेली मुलाखत अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. ही चित्रफीत दाखविण्यामागचा उद्देश तसेच अशा महिलांना आपण बेळगावात आमंत्रित करून प्रत्यक्ष ऐकले पाहिजे, असे किशोर काकडे यांनी सांगितले.









