जिल्हा प्रशासनाकडून जय किसान भाजी मार्केटला सूचना : शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न
बेळगाव : जिल्हाधिकारी, जय किसान भाजी मार्केट पदाधिकारी व विविध शेतकरी संघटनांच्या सदस्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. शेतकऱ्यांना कुठेही त्रास होऊ नये याची खबरदारी जिल्हा प्रशासन घेत आहे. लहान व्यापाऱ्यांसाठी एपीएमसीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने पर्याय सुचविले आहेत. त्यांनी आपली भूमिका गुऊवारी संध्याकाळपर्यंत जिल्हा प्रशासनाला कळवावी, असे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी स्पष्ट केले.
बैठकीला बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे तसेच शेतकरी व जय किसान भाजी मार्केटचे पदाधिकारी उपस्थित होते. रिटेल टेडर्सना कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. गुऊवारपासून एपीएमसीमध्ये लहान व्यापाऱ्यांचे व्यवहार सुरू होणार आहेत. तसेच मोठ्या व्यापाऱ्यांसाठी त्यांना हवे त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. शेतकऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. रिटेल विव्रेत्यांनी दोन एकर जागा पाहणी केली असून त्याची पाहणी जिल्हा प्रशासनाकडून केली जाणार आहे. त्या ठिकाणी शेड तसेच शौचालय यांची व्यवस्था केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
व्यापार परवाना रद्द करण्यात आल्याने जय किसान भाजी मार्केट बंद ठेवण्यात आले आहे. परंतु कोणत्याही शेतकऱ्यावर याच भाजी मार्केटमध्ये व्यवसाय करावा अशी सक्ती करण्यात आलेली नाही. तसेच कायद्याच्या चौकटीत राहून जय किसान भाजी मार्केटबाबत पुढे काय करता येईल या संदर्भात पदाधिकाऱ्यांशी चर्चा करू, असे आश्वासन जिल्हाधिकारीऱ्यांनी दिले. बुधवारी दुपारी जय किसान भाजी मार्केटमध्ये विविध शेतकरी संघटनांनी आंदोलन केले. भाजी मार्केट पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली. शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत येणार होते. त्यापूर्वीच शेतकऱ्यांची समजूत कढण्यासाठी जिल्हाधिकारी जय किसान भाजी मार्केट येथे पोहोचले. यावेळी त्यांनी जय किसान भाजी मार्केटचे पदाधिकारी तसेच शेतकरी संघटनेच्या सदस्यांशी चर्चा करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला
कोणतेही भाजी मार्केट सील करण्यात आलेले नाही. तसेच दुकानांनाही टाळे ठोकण्यात आलेले नाहीत. जय किसान भाजी मार्केटच्या पदाधिकाऱ्यांना न्यायालयात जाण्याचा पर्याय खुला आहे. शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये अशी जिल्हा प्रशासनाची भूमिका आहे. त्यामुळे ते आपल्याला हवे त्या ठिकाणी व्यवसाय करू शकतात. सध्या एपीएमसी मार्केटमध्ये खुले असलेल्या दीडशे दुकानदारांमध्ये व्यापार करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले, पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा शेतकऱ्यांवर दबाव आणला जाणार नाही. केवळ कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही पोलीस भाजी मार्केटमध्ये तैनात करण्यात आले आहेत. परंतु पोलिसांनी कोणत्याही दुकानावर कारवाई किवा दुकान बंद केले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.









