कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक, संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे प्रतिपादन
वार्ताहर/ नंदगड
मराठी भाषेतील संत, साहित्य हे आजही आजरामर आहे. त्याच साहित्याच्या आधारातून विविध साहित्याची निर्मिती होते. आजच्या प्रत्येक साहित्यात संतांच्याच विचाराचा पगडा दिसून येतो. आज जागतिक साहित्यात नवनिर्मिती होत असली तरी, संत साहित्याचाच त्याला आधार आहे. प्रत्येक माणसाची मातृभाषा ही श्रेष्ठ असते. आजपर्यंतच्या इतिहासात साहित्य जगतात कोणत्याही दुसऱ्या भाषेचा द्वेष करण्यात येत नाही. प्रत्येक भाषेचा आदर व्हावा आणि प्रत्येकाने जागतिक साहित्य वाचन करावे, असे प्रतिपादन माचीगड येथील श्री सुब्रह्मण्य साहित्य अकादमीतर्फे आयोजित 28 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरुन बोलताना कोल्हापूर येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी केले.
प्रत्येक मराठी माणसाने भाषेवर प्रेम करायला हवे. कोणतीही भाषा कोणत्याही रंगाची, वर्णाची, जातीची नाही. ती सर्वांचीच भाषा आहे. लहान वयात जितक्या भाषा मुलाना शिकता येतील त्या शिकून, समजून घेतल्या पाहिजेत. भाषाही कुणाची मक्तेदारी नाही. त्यामुळे सर्वानी विविध भाषेचे ज्ञान संपादन करून, भाषा टिकवण्यासाठी प्रयत्न करावा, भाषा टिकवण्यासाठी त्या भाषेतील संमेलने, चर्चासत्रे, व्याख्यानमाला व भाषा संवर्धनाबाबतचे सर्व कार्यक्रम लोकानी करावेत, त्यात सहभाग घ्यावा व सहकार्य द्यावे, मानवी मनाचा समग्र अभ्यास करावा, मानवी विकृती व संस्कृती यांचा अभ्यास असलेला खूप मोठा संत म्हणजेच तुकाराम महाराज होत. त्यांनी स्वत: हालअपेष्ठा सोसून लोकापर्यंत मराठी साहित्य व अभंग पोहचविले. पसायदन मागणाऱ्या ज्ञानेश्वरांचे कार्यही तितकेच महत्त्वाचे आहे.
सीमाभागात मराठी जिवंत ठेवण्याचे काम खानापूर वासियांकडून
महाराष्ट्रातील मुंबईसारख्या ठिकाणी मराठी भाषा बोलण्याची संख्या थोडीफार कमी होत असली तरी सीमाभागात मराठी भाषा टिकविण्याच काम खानापूर वासियानी उत्तमप्रकारे केले आहे. यात माचीगड गावच्या जनतेकडून संमेलन दरवर्षी करीत असल्याबद्दल माचीगड ग्रामस्थांचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी उद्घाटन भाषणात अभिनंदन केले.
मान्यवरांनी केले संमेलनाचे उद्घाटन
संमेलनाचे उद्घाटन आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, डॉ. रफिक हलशीकर, उद्योजक विकास देसाई, सुब्रह्मण्य साहित्य अकादमीचे अध्यक्ष बाबूराव पाटील, स्वागताध्यक्ष पिटर डिसोजा, ग्रा. पं. अध्यक्षा दुर्वा सुतार, आर. बी. पाटील, माजी जि. पं. सदस्य पुंडलिक कारलगेकर आदीसह अन्य मान्यवर उपस्थित होते. माचीगड येथील एकनाथ मंदिरापासून मान्यवर व साहित्यिकांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन होऊन ग्रंथदिंडीला सुरवात झाली.
यावेळी सुब्रह्मण्य देवाचे पूजन साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केले. छ. शिवाजी महाराज पुतळ्याचे पूजन तुकाराम गावडा, कै. अजित सगरे साहित्य नगरीचे उद्घाटन झे. बी. फर्नांडिस व प्रा. पी. के. पवार, कथाकार कै. महादेव मोरे, प्रवेशद्वाराचे उद्घाटन निवृत प्रा. पी. के. चापगावकर, कै. सिद्धोजी पाटील सभागृहाचे उद्घाटन वसंत पाटील, सुब्रह्मण्य व्यासपीठाचे उद्घाटन पांडुरंग पाटील, गणेश प्रतिमा पूजन पुनित पाटील, संत ज्ञानेश्वर माउली प्रतिमा पूजन अनिल सुतार, सावित्रीबाई फुले फोटोपूजन आप्पाजी पाटील, तुकाराम महाराजांच्या फोटोच पूजन पी. एस. देसाई, शिवाजी महाराज प्रतिमेचे पूजन भालचंद्र पाटील यांनी केले. सूत्रसंचालन साहित्य अकादमीचे सचिव संजीव वाटुपकर व एम. पी. गिरी यांनी केले.
विविध मान्यवरांचा सत्कार
वैष्णवी हलगेकर हिने दहावीच्या परीक्षेत मराठी विषयात 125 पैकी 125 गुण घेतल्याबद्दल तसेच सातवीच्या वर्गात माचीगड शाळेत 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल श्रृती बावडेकर या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. तसेच आदर्श प शिक्षक प्रकाश मादार, के. आर. गुरव यांना पुरस्कार देऊन गौरविले. तरुण भारतचे खानापूरचे प्रतिनिधी विवेक गिरी यांना उत्कृष्ट पत्रकारितेचा पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते गोरविले.
मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
यावेळी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कथाकार महादेव मोरे, प्रा. अजित सगरे, सिद्धोजी पाटील व शहीद जवान आदींच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली.









