कमी-जास्त प्रमाणात पाऊस : जोरदार पावसाची प्रतीक्षा
बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी वळीव पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र अद्याप जोरदार वळीव पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन ढगांच्या गडगडाटासह कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस होऊ लागला आहे. विशेषत: उष्म्यात उच्चांकी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढत्या उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाच्या सरीने काहीसा गारवा निर्माण झाला आहे.
हवामान खात्याने यंदा मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यानुसार सध्या वातावरणात बदल झाला आहे. मंगळवारी शहरातील पूर्व भागात वळीव पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. मात्र उर्वरित भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. तर काही ठिकाणी केवळ शिडकावाच झाला. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वळीव पाऊस झाला होता. त्यानंतर पावसाने हुलकावणी दिली आहे. काही भागात पाऊस झाला असला तरी शहरी भागात मागील महिन्याभरात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे वाढत्या उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.









