चांद्रयान अभियान अंतिम टप्प्यात : देशभरात उत्सुकता शिगेला, इस्रोला यशाची अपेक्षा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चांद्रयान-3 अभियानाचा आतापर्यंतचा प्रवास अत्यंत सुरळीत पार पडला असून या अभियानातील ‘विक्रम’ हे अवतरण वाहन (लँडर) उत्तम रितीने कार्य करीत आहे. ते अपेक्षेप्रमाणे बुधवारी संध्याकाळी सहा ते सव्वासहा या वेळेत चंद्राच्या पृष्ठभागावर सुखरुपपणे उतरण्याची मोठी शक्यता आहे, असे आश्वासक प्रतिपादन भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) अधिकाऱ्यांनी पेले आहे. या अभियानासंबंधी संपूर्ण देशातच नव्हे, तर जगभरात उत्सुकता शिगेला पोहचली असून ते यशस्वी व्हावे, अशी प्रार्थना सर्व भारतीय करीत आहेत.
सोमवारी विक्रम या अवतरण वाहनाने भारताच्या चांद्रयान-2 अभियानातील ऑर्बिटरशी यशस्वीरित्या संपर्क केला होता. यावरुन विक्रमचे कार्य अत्यंत सुरळीतपणे होत असल्याचे स्पष्ट होत आहे. विक्रमने चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणाऱ्या पृष्ठभागाची महत्त्वाची छायाचित्रे पाठविली आहेत. या छायाचित्रांमुळे चंद्रासंबंधीची नवी माहिती हाती लागणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.
5.20 ला काऊंटडाऊनचा प्रारंभ
बुधवारी संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 5 वाजून 20 मिनिटांनी या अभियानाच्या सर्वात महत्त्वाच्या आणि निर्णायक टप्प्याचा प्रारंभ होणार आहे. या कालावधीत विक्रम वाहन हळूहळू चंदाच्या पृष्ठभागाच्या दिशेने उतरु लागेल. विक्रम या वाहनाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर योग्य आणि सुरक्षित स्थळ शोधण्यास प्रारंभ केला आहे. हे स्थळ मिळताच या अभियानाचा आणखी एक भाग पूर्ण होणार आहे. स्थळ शोधण्यासाठी लँडर पोझिशन डिटेक्टर कॅमेऱ्याचा (एलपीडीसी) उपयोग केला जात आहे. सध्या चंद्रापासूनचे विक्रमचे न्यूनतम अंतर 70 किलोमीटर असून प्रत्यक्ष अवतरणाच्या वेळी ते याहीपेक्षा कमी होणार आहे.
पर्यायी कालावधीही उपलब्ध
विक्रम हे वाहन चंद्रावर पूर्वनिर्धारित समयीच अवतीर्ण होईल, असा विश्वास संस्थेच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. मात्र, काही कारणामुळे ते शक्य न झाल्यास हे अभियान 27 ऑगस्टपर्यंत लांबविण्याचाही पर्याय उपलब्ध ठेवण्यात आला आहे. बाह्या परिस्थिती अनुकूल नसल्यास विक्रमचे चंद्रावतरण 23 ऑगस्टला न करता 27 ऑगस्टला करण्यात येण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.
दोन तास आधी निर्णय घेणार
विक्रमच्या अवतरणासाठी परिस्थिती अनुकूल आहे किंवा नाही याचा निर्णय प्रत्यक्ष अवतरणापूर्वी 2 तास आधी घेण्यात येणार आहे. चंद्रावरील परिस्थिती आणि विक्रमची प्रकृती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे. एखादा घटक जरी अनुकूल नसल्याचे जाणवले, तर अवतरण 27 ऑगस्टपर्यंत पुढे नेण्यात येईल, अशी माहिती इस्रोचे संचालक निलेश एम. देसाई यांनी मंगळवारी दिली









