सीडीएस अनिल चौहान यांची संरक्षणमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, बीएसएफ प्रमुखांची उपस्थिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत सरकारने कठोर भूमिका स्वीकारत दहशतवादाविरुद्ध निर्णायक कारवाई सुरू केली आहे. एकीकडे जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून सतत शोधमोहीम राबविण्याची प्रक्रिया सुरू असतानाच दुसरीकडे एनआयए या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. दरम्यान, संरक्षण आणि सुरक्षेशी संबंधित उच्च अधिकाऱ्यांच्या बैठकांची मालिकाही सुरू आहे.
संरक्षण प्रमुख (सीडीएस) जनरल अनिल चौहान रविवारी एका महत्त्वाच्या बैठकीसाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. ही बैठक दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या आणि जम्मू काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती मजबूत करण्याच्या रणनीतीवर केंद्रित होती. सीडीएस चौहान यांनी सुरक्षा दलांशी संबंधित ताज्या परिस्थितीची माहिती राजनाथ सिंग यांना दिली. तसेच पहलगाम हल्ल्यानंतरची सुरक्षा आणि भविष्यातील रणनीती यावर चर्चा झाल्याचे समजते. दुसरीकडे, सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक दलजित सिंग चौधरी गृह मंत्रालयातील एका उच्चस्तरीय बैठकीला पोहोचले होते. त्याठिकाणीही दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या कारवाया आणि सीमा सुरक्षेवर चर्चा झाली.
22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करून 26 पर्यटकांची हत्या केल्यापासून सुरक्षा दलांकडून खोऱ्यात शोधमोहीम सुरू आहे. किश्तवाडमधील जिल्हा प्रशासनाने लष्कराच्या गणवेशाची विक्री, शिवणकाम आणि साठवणूक करण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांत सुरक्षा दलांनी काश्मीर खोऱ्यात 10 दहशतवाद्यांची घरे उडवून दिली आहेत. कुपवाडाच्या कांही खास भागात अज्ञात हल्लेखोरांनी 45 वर्षीय गुलाम रसूल मगरे यांची त्यांच्या घरी गोळ्या घालून हत्या केली. पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरच्या जंगलात आणि संवेदनशील भागात शोधमोहीम तीव्र केली आहे. अनेक संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नौदलाचा अरबी समुद्रात सराव
नौदलाने अरबी समुद्रात अनेक जहाजविरोधी गोळीबार कवायती केल्या. विशेष म्हणजे या काळात डागण्यात आलेले क्षेपणास्त्र लक्ष्यावर अचूक मारा करू शकतात. देशाच्या सागरी सुरक्षेसाठी आम्ही पूर्णपणे सज्ज असल्याचे नौदलाने म्हटले आहे. दुसरीकडे, संशयित दहशतवाद्यांना शोधण्यासाठी लष्कर, जम्मू काश्मीर पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) संयुक्त मोहीम राबवत आहेत. त्याशिवाय एनआयएची एक विशेष टीम पहलगाममध्ये पोहोचली असून ती हल्ल्यामागील कट आणि दहशतवादी नेटवर्क शोधण्यात गुंतलेली आहे.
नियंत्रण रेषेवर संघर्षस्थिती कायम
दरम्यान, शनिवारी रात्री पाकिस्तानने सलग तिसऱ्या दिवशी नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. हा गोळीबार तूतमारी गली आणि रामपूर सेक्टरमध्ये करण्यात आला. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. मात्र, जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
दोन दिवसांत 272 पाकिस्तानी मायदेशी
गेल्या दोन दिवसांत 272 पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून भारतातून बाहेर पडले आहेत. रविवारीही अनेक पाकिस्तानी नागरिक भारत सोडण्याच्या तयारीत होते. 27 एप्रिल ही व्हिसावर भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांसाठी भारत सोडण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे रविवारी अटारी-वाघा सीमेवर मोठ्या संख्येने पाकिस्तानी नागरिक दाखल झाले होते. अनेक लोक आपापले सामान घेऊन रांगेत उभे असलेले दिसले. यामध्ये महिला, वृद्ध आणि लहान मुलेदेखील समाविष्ट होती. आपल्या भारतीय नातेवाईकांना निरोप देताना लोक भावनिक झालेलेही दिसले. केंद्र सरकारने अलीकडेच पाकिस्तानी नागरिकत्वाच्या व्हिसाची मुदत संपलेल्यांना ताबडतोब भारत सोडून जाण्याचे निर्देश जारी केले होते. तर वैद्यकीय व्हिसावर भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत देश सोडावा लागेल. पंजाबमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून 13 राजनयिक आणि अधिकाऱ्यांसह 629 भारतीय भारतात परतले आहेत.
सरकारने सामान्य लोकांची काळजी घ्यावी : मेहबुबा
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारला एक आवाहन केले आहे. दहशतवादी आणि सामान्य लोकांमध्ये फरक आहे. या दोन्ही बाबींमध्ये सरकारने काळजी घेतली पाहिजे. हजारो लोकांना अटक केली जात असल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच दहशतवाद्यांसोबतच सामान्य लोकांची घरेही उद्ध्वस्त करण्यात येत असल्याचा दावा करत सामान्य लोकांबद्दल सावधगिरी बाळगावी, असे आवाहन मुफ्ती यांनी केले.









