ठिकठिकाणी पार्ट्याचे आयोजन, हॉटेल-रिसॉर्ट बुकिंगवर भर
प्रतिनिधी/ बेळगाव
सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली जात आहे. काहीजणांनी गोवा, मालवण यासह इतर पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन केले आहे. तर काहींनी कुटुंबासमवेत हॉटेल रिसॉर्टवर नववर्षाचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. बालचमू मात्र ओल्ड मॅन तयार करण्यात गुंतला असून शहरात एकापेक्षा एक सरस ओल्ड मॅन तयार करण्यात आले आहेत.
इयर एडिंग म्हटले, की पार्ट्यांचे नियोजन हे आलेच. यामध्ये विशेषत: तरुणाई सर्वात पुढे असते. बेळगाव परिसरातील हॉटेल्समध्ये 31 डिसेंबरनिमित्त पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अनेक ठिकाणी डिजे नाईटस् ठेवण्यात आले आहेत. मागील आठवडाभरापासून हॉटेल चालकांकडून यासंदर्भातील जाहिरात केली जात आहे. त्याचबरोबर शहरापासून दूर खानापूर, दांडेली येथील रिसॉर्टवर सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अॅडव्हान्स बुकिंग करण्यात आले आहे.
यावर्षी 31 डिसेंबर मंगळवारी आल्याने खवय्यांकडून आतापासूनच खाद्यपदार्थांचे अॅडव्हान्स बुकिंग केले जात आहे. चिकन, मटण दुकानदारांनी यासाठी मागील दोन दिवसांपासून जमवाजमव सुरु केली आहे. काहींनी शिवारांमध्ये पार्ट्या करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे एकूणच 31 डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे. बेळगाव शहरात अनेक ठिकाणी तरुणांनी ओल्ड मॅन तयार केले आहेत. विशेषत: कॅम्प भागामध्ये भव्य दिव्य व चित्रपटातील एखाद्या अॅनिमेटेड राक्षसाप्रमाणे 5 फुटापासून 25 फुटापर्यंत ओल्ड मॅन तयार करण्यात आले आहे. त्यामुळे हे ओल्ड मॅन पाहण्यासाठी सोमवारी रात्रीपासूनच गर्दी होऊ लागली आहे. विक्रीसाठीदेखील ओल्ड मॅन बाजारात ठेवण्यात आले आहेत.









