जम्मू-काश्मीरमध्ये दस्तऐवज पडताळणीची प्रक्रिया सुरू : पाकिस्तानी पत्नींबद्दल अंतिम निर्णय लवकरच
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये अवैध स्वरुपात राहत असलेल्या हजारो विदेशी नागरिकांच्या अडचणी वाढणार आहेत. या विदेशी नागरिकांच्या दस्तऐवजांच्या पडताळणी सुरू करण्यात आली आहे. याप्रकरणी एक उच्चस्तरीय समिती चौकशी करत आहे. या समितीची स्थापना काही दिवसांपूर्वी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी केली होती. समिती 1 जानेवारी 2011 पासून कुठल्याही दस्तऐवजाशिवाय जम्मू-काश्मीरमध्ये राहत असलेल्या विदेशी नागरिकांची ओळख पटविणार असून यासंबंधीचा अहवार दर महिन्याच्या 7 तारखेला गृह मंत्रालयाला सोपविणार आहे.
केंद्रशासित प्रदेशात म्यानमार, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळशी संबंधित सुमारे 12 हजार विदेशी आणि 8 हजारांहून अधिक रोहिंग्या लोक राहत आहेत. यातील निम्म्या लोकांकडेच संयुक्त राष्ट्रसंघाचे ओळखपत्र असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांची ओळख पटल्यावर त्यांना त्यांच्या मायदेशी पाठविण्याची तयारी आहे. या सर्व विदेशी नागरिकांवर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे. केंद्रशासित प्रदेशात रोहिंग्यांचे डोमिसाइल तयार होत आहेत. अलिकडेच किश्तवाडमध्ये एका रोहिंग्या महिलेकडे डोमिसाइल मिळाले होते, ज्यानंतर उपराज्यपालांनी याप्रकरणी पोलीस चौकशी करविली होती.
अवैध वास्तव्य करणारे विदेशी नागरिक अंतर्गत सुरक्षेसाठी धोका ठरत असल्याचे दिसून आले आहे. याचमुळे अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांबद्दल चौकशी करण्यात येत आहे. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी उपराज्यपालांनी पंतप्रधानांची भेट घेत त्यांना सविस्तर माहिती दिली होती.
विदेशींवरील कारवाईची कारणे
समिती स्थापन करण्यापूर्वी प्रशासनाने अवैध वास्तव्य करणाऱ्या विदेशी नागरिकांमुळे निर्माण होणाऱ्या समस्या जाणून घेतल्या आहेत. हिंदूबहुल जम्मूमध्ये रोहिंग्या मुस्लीम शरणार्थींची संख्या वाढत असल्याचे अध्ययनात आढळून आले आहे. रोहिंग्या मुस्लिमांच्या वाढत्या संख्येमुळे भविष्यात सामाजिक तणाव निर्माण होण्याची भीती आहे. या रोहिंग्यांना जम्मूमधून हटवून निर्वासित करण्यासाठी राजकीय दबाव देखील आहे. बहुतांश रोहिंग्या हे सीमेनजीक वास्तव्य करून असल्याचे आढळून आले आहे. या विदेशी नागरिकांची पडताळणी झालेली नाही. याचमुळे हे रोहिंग्या दहशतवादी किंवा अमली पदार्थ तस्करांना मदत करणारे ठरू शकतात. तर शसत्र खाली ठेवलेल्या उग्रवाद्यांच्या 350 पत्नी काश्मीरमध्ये वास्तव्य करत आहेत. या सर्व महिला पाकिस्तानच्या नागरिक असून त्या कुठल्याही दस्तऐवजाशिवाय राहत आहेत. या महिलांक सातत्याने निदर्शने करून मान्यता देण्यासाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. याचमुळे दस्तऐवजांची पडताळणी केल्यावर प्रशासन यासंबंधी अंतिम निर्णय घेऊ इच्छिते. याचबरोबर केंद्रशासित प्रदेशात काही विदेशी नागरिक हे पर्यटक व्हिसावर दाखल झाले होते, परंतु त्यानंतर ते एनजीओंमध्ये सामील होत येथेच राहू लागले आहेत. अशा लोकांची देखील ओळख पटविली जाणार आहे.
रोहिंग्यांचा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग
जम्मू-काश्मीरमध्ये 2012 पासून रोहिंग्या राहत आहेत. यातील काही जणांकडेच संयुक्त राष्ट्रसंघाचे शरणार्थी ओळखपत्र आहे. ओळखपत्र तयार करवून घेण्यासाठी यातील काही रोहिंग्या महिलांच मानवी तस्करी झाल्याच्या घटनाही उघडकीस आल्या आहेत. मार्च 2021 मध्ये रोहिंग्यांची ओळख पटविण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली हीत. बायोमेट्रिकनंतर 300 अवैध शरणार्थी आढळून आले होते, त्यांना जम्मूच्या हिरानगर तुरुंगातील अस्थायी ताबा केंद्रात ठेवण्यात आले आहे









