जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची अधिकाऱ्यांना सूचना : जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणाची बैठक
बेळगाव : महाराष्ट्र व बेळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यातील नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी, महापूर यासारख्या आपत्तींशी सामना करण्याच्यादृष्टीने तयारी करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा आपत्ती नियंत्रण प्राधिकरणच्या बैठकीमध्ये अध्यक्षस्थानावर जिल्हाधिकारी रोशन बोलत होते. बेळगाव, हुक्केरी, खानापूर, निपाणी, चिकोडी भागामध्ये पावसाचे प्रमाण वाढले असून अधिकाऱ्यांनी धरणांच्या पाण्याच्या पातळीवर लक्ष ठेवावे, आवश्यक असलेल्या ठिकाणी नागरिकांना जागृत करून जनता व जनावरांच्या स्थलांतरासाठी सूचना करावी.
मदत केंद्रांची नोंद घेऊन तेथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. मार्कंडेय धरणामध्ये पाणी सोडल्यास गोकाकमधील काही गावांत पाणी शिरते. त्यामुळे जनतेला सावध करण्याच्यादृष्टीने अशा भागाला भेटी देऊन पाहणी करावी, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी गोकाकच्या तहसीलदारांना केली. पाण्याखाली गेलेल्या पुलांवर बॅरिकेड्स लावण्यात यावेत. पुलांची परिस्थिती पाहून बॅरिकेड्स उभारण्यात यावेत. सध्या कोयना जलाशयामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत पाण्याचे प्रमाण वाढले आहे. महाराष्ट्रातील धरणामधून आणखी पाणी बाहेर सोडण्याची शक्यता असून कोयना जलाशयातील पाण्याच्या पातळीची माहिती देण्यासाठी जिल्ह्यात एक नोडल अधिकारी नेमण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
हिडकल धरण व मार्कंडेय धरणातील पाण्याची पातळी, विसर्ग यावर लक्ष ठेवावे. जनतेच्या रक्षणासाठी बोट, वॉटर जॅकेट, बॅरिकेड्स, लाईट्स यासारख्या साधनांचा उपयोग करण्याबरोबरच गृहरक्षक दल, अग्निशमन दल यांचीही व्यवस्था करण्यात येईल. अतिवृष्टीप्रसंगी आवश्यक असणारी सुरक्षा सामुग्री तयार ठेवून ती तत्काळ पुरवावी, अशी सूचना सर्व तहसीलदारांना केली. मदत केंद्रांमध्ये पौष्टिक आहार, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या मूलभूत सुविधा देऊन त्यांचा अहवाल सादर करावा. सर्व तालुक्यातील तहसीलदारांनी जिल्हास्तरीय कंट्रोल रुमच्या संपर्कात रहावे. बेळगाव महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील गटारींची स्वच्छता करावी, शहरातील प्रमुख रस्त्यांच्या बाजूने उभारलेली धोकादायक झाडे तोडावीत अशाही सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे म्हणाले की, गांधीनगरातील पुलाच्या बाजूने असलेल्या गटारी भरून पुलाच्या रस्त्यावर पाणी येत आहे. सांबरा रोडवरील पुलाचीही अशीच परिस्थिती आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने व्यवस्था करावी. ग्रामीण भागातील पूल, पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची त्वरित दुरुस्ती करून अहवाल द्यावा. नाला, बॅरेजांचे ब्लॉक स्वच्छ करावेत, अशी सूचना जि. पं. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी केली. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद, प्रांताधिकारी श्रवण नाईक, तहसीलदार बसवराज नागराळ, जि. पं. चे उपसचिव बसवराज हेग्गनायक, जिल्हा आरोग्य-कुटुंब कल्याण अधिकारी ईश्वर गडाद, जिल्हा नगर विकास योजना कोषचे संचालक मल्लिकार्जुन कलादगी यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार, कार्यकारी अधिकारी, व्हिडिओ संवादामध्ये सहभागी झाले होते.
कंट्रोल रुमची स्थापना
जिल्हा प्रशासनातर्फे अतिवृष्टी, महापूर यासारख्या आपत्तींना सामोरे जाण्याच्या दृष्टीने कंट्रोल रुम स्थापन करावेत. तालुका आणि ग्राम पातळीवरील अधिकाऱ्यांनी कंट्रोल रुमला अहवाल सादर करावा, अशी सूचना प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी अभिनव जे. यांनी केली.









