जून महिन्यात भारतात होणार मोठी बैठक : मध्य आशियाई देशांसोबत उचलणार पाऊल
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारत पाकिस्तानला अजून अद्दल घडविणार आहे. भारताने आता पाकिस्तानला जागतिक स्तरावर एकाकी पाडण्याची योजना हाती घेतली आहे. भारत जून महिन्यात 5 मध्य आशियाई देशांच्या विदेश मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करणार आहे. यादरम्यान दहशतवादावरून देखील महत्त्वाची बैठक होणार आहे.
चाबहार बंदर प्रकल्पाद्वारे भारत पाकिस्तानला एकाकी पाडू इच्छित आहे. अलिकडच्या काळात पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील संबंध बिघडले आहेत. पाकिस्तानी बंदरांवरील अफगाणिस्तानची निर्भरता कमी करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे. तर चाबहार बंदराद्वारे भारताच्या नेतृत्वाखालील आयएनएसटीसी प्रकल्पात सामील होण्याची इराणची इच्छा आहे. जून महिन्यात कजाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझ्बेकिस्तानचे विदेश मंत्री भारतात येणार आहेत. कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझ्बेकिस्तानने यापूर्वीच आयएनएसटीसी आणि चाबहार बंदराद्वारे भारताशी थेट व्यापार सुरू केला आहे.
भारत या देशांसमोर पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याचा खुलासा करणार आहे, यामुळे पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा संदेश जगात पोहोचणार आहे. मध्य आशिया हे क्षेत्र अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या नजीक आहे. याचमुळे मध्य आशियाला देखील दहशतवादाचा सामना करावा लागतोय. पाकिस्तान कशाप्रकारे दहशतवाद्यांचा जागतिक अ•ा ठरत आहे, हे आता या देशांनाही सांगण्यात येईल. यानंतर भारत-मध्य आशिया शिखर परिषदेचे आयोजन होण्याची शक्यता आहे.
दहशतवादविरोधी सहकार्य
विदेश मंत्र्यांच्या या बैठकीत दहशतवाद विरोधी सहकार्यावर चर्चा होणार आहे. याचबरोबर यूरेशियामध्ये संपर्कव्यवस्था सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. यात इंटरनॅशनल नॉर्थ साउथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर (आयएनएसटीसी) आणि इराणमधील चाबहार बंदरासारखे प्रकल्प सामील आहेत.
भारताकरता सकारात्मक संकेत
कजाकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझ्बेकिस्तानने आयएनएसटीसी आणि चाबहार बंदराद्वारे भारताला सामग्री पाठविण्यास सुरुवात केली आहे. मध्य आशियाई देशांकडून नैसर्गिक साधनसंपत्ती आणि आवश्यक खनिजे भारत खरेदी करू इच्छितो. याचबरोबर भारत मध्य आशियासोबत संरक्षण संबंध वृद्धींगत करू इच्छित आहे. सोव्हियत महासंघाच्या काळापासूनच मध्य आशियात भारताची प्रतिमा चांगली राहिली आहे. मध्य आशियाच्या काही भागांमध्ये कट्टरवादी नेटवर्क वाढत असल्याने भारत, मध्य आशिया आणि रशियाला चिंता सतावत आहे. या कट्टरवादी समुहांचे कनेक्शन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानशी जोडलेले आहे. मागील काही महिन्यांमध्ये किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि कजाकिस्तानात अनेक दहशतवादी समुहांची धरपकड करण्यात आली आहे. तर चालू वर्षात मॉस्को क्षेत्रात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे कनेक्शन देखील मध्य आशिया आणि अफगाणिस्तान-पाकिस्तान क्षेत्राशी जोडलेले होते.









