पहलगाम हल्ल्याप्रकरणी एफएटीएफचे महत्त्वपूर्ण वक्तव्य
वृत्तसंस्था/ पॅरिस
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा जगासमोर आला आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानला ग्रेट लिस्टमध्ये सामील करण्याची मागणी केली जात आहे. याचदरम्यान जागतिक स्तरावर टेरर फंडिंगवर नजर ठेवणारी संस्था एफएटीएफने (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) 22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची निंदा केली आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे समर्थनप्राप्त दहशतवाद्यांनी 26 लोकांची हत्या केली होती. अशाप्रकारचे दहशतवादी हल्ले वित्तपुरवठा आणि नेटवर्कशिवाय होऊ शकत नाहीत, असे वक्तव्य एफएटीएफने सोमवारी केले आहे. एफएटीएफचे हे वक्तव्य थेट स्वरुपात पाकिस्तानवर निशाणा साधणारे आहे.
सदस्य देशांकडून दहशतवादासाठीचा वित्तपुरवठा रोखण्यासाठी उचलण्यात येणाऱ्या ठोस आणि प्रभावी पावलांवर अधिक लक्ष देत असल्याचे एफएटीएफने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवादाला दिले जाणारे पाठबळ आणि वित्तपुरवठ्यासंबंधीचे पुरावे भारताने मांडले असताना एफएटीएफने हे वक्तव्य केले आहे.
भारत आता पाकिस्तानला पुन्हा एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये सामील करविण्यासाठी प्रक्रिया सुरू करणार आहे. भारत 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आशिया पॅसिफिक ग्रूपची बैठक आणि 20 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या एफएटीएफच्या पूर्ण बैठकीपूर्वी पाकिस्तान विरोधात एक विस्तृत डोजियर तयार करत आहे.
पाकिस्तानला पहिल्यांदा 2008 साली एफएटीएफच्या ग्रे लिस्टमध्ये सामील करण्यात आले होते. 2010 मध्ये पाकिस्तानला या यादीतून हटविण्यात आले, परंतु 2012 मध्ये पुन्हा सामील करण्यात आले. 2015 मध्ये पाकिस्तानला या यादीतून वगळण्यात आले, मग 2018 मध्ये पुन्हा ग्रे लिस्टमध्ये सामील करण्यात आले. ऑक्टोबर 2022 मध्ये एफएटीएफने पाकिस्तानला या यादीतून वगळले असले तरीही सुधारणा जारी ठेवण्याचे निर्देश दिले होते.
एफएटीएफनुसार जगातील 200 हून अधिक देश आणि क्षेत्र याच्या नेटवर्कशी जोडले गेले आहेत आणि सर्व जण मिळून दहशतवादाला होणारा वित्तपुरवठा रोखण्यासाठी काम करत आहेत. सोशल मीडिया, क्राउड फंडिंग आणि व्हर्च्युअल असेट्स यासारख्या नव्या धोक्यांवरून इशारा जारी करत लवकरच एक विस्तृत विश्लेषण प्रकाशित करणार असल्याचे एफएटीएफने अलिकडेच सांगितले आहे.









