13,850 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी, पत्नीसह बेल्जियममध्ये वास्तव्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गीतांजली जेम्सचे मालक आणि 13,850 कोटी रुपयांच्या बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सी याला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न गतिमान करण्यात आले आहेत. चोक्सीला भारतात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी बेल्जियम सरकारला प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले आहे. तो सध्या पत्नी प्रीती चोक्सीसह बेल्जियममध्ये राहत आहे. ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’वर बेल्जियममधील अँटवर्प येथे सध्या त्याचे वास्तव्य आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यानंतर तो 2018 मध्ये भारतातून अँटिग्वा-बार्बुडा येथे फरार झाला होता.
मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्यावर मुंबईतील पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेत 13,850 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. यापूर्वी चोक्सीने आपला पासपोर्ट निलंबित झाल्यामुळे तो भारतात परतू शकत नसल्याचे निमित्त केले होते. चोक्सीने 2018 मध्ये भारत सोडण्यापूर्वी 2017 मध्येच अँटिग्वा-बार्बुडाचे नागरिकत्व घेतले होते. मेहुल चोक्सीने प्रकृती बिघडल्याचे कारण देत भारतात हजर राहण्यास वारंवार नकार दिला. कधीकधी त्याचे दर्शन फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत होते. आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमुळे भारतातील त्याच्या अनेक मालमत्ताही जप्त करण्यात आल्या आहेत.









