दिल्ली : २०२३ साली शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३४९ वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता आतापासूनच तयारी सुरू करण्यात यावी, यासह विविध विषयांवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांच्याशी आज धरोहर भवन, दिल्ली येथे भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा केली.
यावेऴी दुर्गराज रायगड येथे सुरू असणाऱ्या कामांबाबत चर्चा झाली. रायगडाच्या राजसदरेवरील काँक्रिटचा थर पुरातत्व विभागाने काढला आहे, मात्र गेले कित्येक आठवडे त्यावर कोणतेही काम केलेले नाही. हे काम तात्काळ सुरू करून राजसदरेचे संवर्धन प्राथमिकतेने पूर्ण करावे, अशा सूचना करण्यात आल्या. त्याचबरोबर सिंहासन चौथऱ्यावरील सिमेंट काँक्रिटचा थर देखील काढून त्याचे ऐतिहासिक स्वरूप परत खुले करावे, असे सांगितले.
रायगडावरिल होळीचा माळ येथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस रायगड विकास प्राधिकरण कडून ऐतिहासिक स्वरूपाचे छत्र बसविले जाणार असून त्याकरिता प्राधिकरणास मान्यता मिळालेली आहे. या परिसराचे सुशोभिकरण पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून पुरातत्व विभागाने ही प्रकिया तात्काळ सुरू करावी, असे बैठकीत ठरले. तसेच, रायगड प्राधिकरणाने पुरातत्व विभागास संवर्धन कामांसाठी निधी दिलेला आहे. त्या निधीतून पुरातत्व विभागाने गडावर उत्खनन देखील करायचे आहे. मात्र या निधीतून केवळ वीस टक्केच काम झालेले असून गडावर लवकरच उत्खनन व संवर्धन कार्य सुरू करावे, असे सूचित केले.
रायगड प्राधिकरण अंतर्गत मटेरियल रोपवे व स्टेट ऑफ दी आर्ट दर्जाचा प्रवासी रोप वे सुरू करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्यात यावी. पुरातत्व विभागामार्फत गडावर येण्यासाठी आकारले जाणारे शुल्क रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. या बैठकीत इतर अनेक विषयावर चर्चा झाली असून लवकरच आवश्यक ती कार्यवाही सुरू केली जाणार आहे. अशी ग्वाही अतिरिक्त महासंचालकांनी दिली.
Previous ArticleRatnagiri : क्रेडिट कार्डच्या बहाण्याने महिलेला 40 हजाराचा गंडा
Next Article पाच शेतमजूरांवर वीज कोसळली; कुरनूरमधील घटना








