तयार खेळपट्ट्या न्यूयॉर्कमधील स्टेडियमकडे रवाना
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
आगामी टी-20 विश्वचषकात वापरण्यात येणार असलेल्या तयार खेळपट्ट्या फ्लोरिडाहून 20 पेक्षा जास्त सेमी-ट्रेलर ट्रकांमधून न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमकडे नेल्या जात आहेत, अशी माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने दिली आहे. इतर सामन्यांबरोबरच या ठिकाणी 9 जून रोजी भारत-पाकिस्तान हा महत्त्वाचा सामनाही होणार आहे.
डिसेंबरच्या अखेरीपासून फ्लोरिडामध्ये या दहा ड्रॉप-इन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत. अॅडलेड ओव्हल येथे मागील दशकभरात वापरले गेलेले तंत्र त्यात वापरण्यात आले आहे, असे आयसीसीने म्हटले आहे. या खेळपट्ट्यांच्या विकासाचे काम अॅडलेड ओव्हल टर्फ सोल्युशन्सने केले आहे. त्याचे नेतृत्व प्रख्यात अॅडलेड ओव्हल हेड क्युरेटर डॅमियन हॉफ यांनी केले आहे.
नासाऊ स्टेडियममध्ये चार खेळपट्ट्dया बसविल्या जातील आणि शेजारच्या सराव सुविधांसाठी अतिरिक्त सहा बसविल्या जातील. अॅडलेड ओव्हल टर्फ सोल्युशन्सचा चमू संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळपट्ट्यांच्या देखभालीच्या बाबतीत स्थानिक मैदान कर्मचाऱ्यांना मदत करण्यासाठी न्यूयॉर्कमध्ये राहील. ‘ड्रॉप-इन स्क्वेअर’ हा अॅडलेड ओव्हल आणि ईडन पार्कसह जगभरात वापरला जाणारा प्रकार आहे.
ही स्पर्धा 2 ते 29 जूनदरम्यान अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये होणार आहे. न्यूयॉर्कमधील सामने मॅनहॅटनच्या पूर्वेकडील नासाऊ काउंटीमधील आयसेनहॉवर पार्क येथे असलेल्या अत्याधुनिक 34 हजार आसनांच्या मॉड्युलर स्टेडियममध्ये होतील. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, कॅनडा, आयर्लंड, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, नेदरलँड्स आणि अमेरिका असे नऊ संघ न्यूयॉर्कमध्ये खेळतील. पहिला सामना श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान 3 जून रोजी होणार आहे.









