50 हजार पोलीस तैनात : जी-20 विशेष गणवेश : दहशतवादविरोधी पथकांची नियुक्ती : 16 हॉटेल्समध्ये उतरणार अतिथी
वृत्तसंस्था/ .नवी दिल्ली
देशाची राजधानी नवी दिल्ली जी-20 शिखर परिषदेसाठी पूर्णपणे सज्ज आहे. अतिथींच्या सुरक्षेपासून त्यांच्या वास्तव्याच्या सुविधेकरता विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भारत जी-20 चा वर्तमान अध्यक्ष म्हणून 9-10 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे. या परिषदेच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीच्या भागांना सजविण्यात आले असून वाहतुकीसंबंधी सर्वसामान्यांना मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत.
दिल्लीत विदेशी अतिथींच्या सुरक्षेकरता मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जी-20 शिखर परिषदेपूर्वी दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव 29 ऑगस्टपासून 12 सप्टेंबरपर्यंत पॅराग्लायडर, हँग-ग्लायडर आणि हॉट एअर बलून यासारख्या अपांरपारिक हवाई प्लॅटफॉर्म्सच्या उ•ाणांवर बंदी घातली आहे. दिल्लीत होणाऱ्या जी-20 परिषदेमुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. आयोजनस्थळांच्या सुरक्षेकरता आर्टिफिशियल इंटेलिजेन्स मॉड्यूलचा वापर केला जात आहे. सुरक्षेकरता दिल्लीत 50 हजार पोलीस जवानांना तैनात करण्यात आले आहे. तर जी-20 परिषदेच्या सुरक्षेत तैनात पोलिसांसाठी विशेष गणवेश तयार करण्यात आला आहे. याचबरोबर दिल्लीत दहशतवादविरोधी पथकही तैनात केले जाणार आहे.

जी-20 परिषदेच्या सुरक्षेची व्यवस्था पाहण्यासाटी अमेरिकेची सीआयए, ब्रिटनची एमआय-6 आणि चीनच्या एमएसएसची पथके दिल्लीत तळ ठोकून आहेत. दिल्लीच्या ज्या हॉटेल्समध्ये जी-20 सदस्य देशांचे प्रमुख वास्तव्य करणार आहेत, त्या हॉटेल्सच्या सुरक्षेसोबत कार्यक्रमस्थळापर्यंत जाणाऱ्या सर्व मार्गांची माहिती या देशांच्या सुरक्षा यंत्रणांना पुरविण्यात आली आहे.
जी-20 परिषद पाहता एनएसजीची 12 हून अधिक पथकांना आयोजनस्थळी तैनात केले जाणार आहे. तसेच दिल्ली पोलिसांच्या स्वॅट टीमसोबत निमलष्करी दलांच्या शीघ्र कृती दलाच्या अनेक पथकांना संबंधित हॉटेल्सच्या आसपास तैनात केले जाणार आहे. याचबरोबर आकाशातूनही दिल्लीवर नजर ठेवली जाणार आहे. याकरता वायुदल आणि सैन्याची हेलिकॉप्टर्स सातत्याने आकाशात गस्त घालणार आहेत. या हेलिकॉप्टर्समध्ये सैन्य आणि एनएसजीचे कमांडो सदैव असणार आहेत.
शत्रू ड्रोनचा धोका पाहता अनेक ठिकाणी ड्रोनविरोधी यंत्रणा तैनात केली जात आहे. तसेच दिल्लीतील गगनचुंबी इमारतींवर एनएसजी आणि सैन्याचे स्नायपर तैनात असणार आहेत.
वाहतुकीवरून सूचना
जी-20 परिषदेदरम्यान अनेक रस्ते बंद असणार आहेत. तर काही प्रमाणात मेट्रोसेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. 7 सप्टेंबरच्या रात्रीपासून कमर्शियल वाहनांच्या नवी दिल्लीतील प्रवेशावर बंदी असणार आहे. परंतु आवश्यक सामग्रीच्या वाहतुकीवर कुठलीच बंदी नसेल. दिल्लीतील वाहतुकीसंबंधी जाणून घेण्यासाठी व्हर्च्युअल हेल्प डेस्क स्थापन करण्यात आला आहे.
शाळा-महाविद्यालये राहणार बंद
जी-20 परिषदेवरून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी सुटी घोषित केली आहे. या तिन्ही दिवशी दिल्ली सरकार तसेच महापालिकेची सर्व कार्यालये बंद असणार आहेत. तसेच शाळांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. सरकारच्या आदेशानुसार जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाने 3 दिवसांची सुटी जाहीर केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वेने दिल्लीत येणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.









