एनआयएचे अधिकारी दल अमेरिकेचा दौरा करणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
मुंबईवर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रमुख आरोपी तहव्वूर राणा याचे भारताला प्रत्यार्पण करण्याचा मार्ग नुकताच अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मोकळा केला आहे. आता भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकरणाने (एनआयए) त्याला भारतात आणण्यासाठी सज्जतेला प्रारंभ केला आहे. त्याच्या प्रत्यार्पणाची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी या प्राधिकरणाचे अधिकारी अमेरिकेला जात आहेत.
तहव्वूर राणा याने त्याचा बालपणापासूनचा मित्र डेव्हीड कोहन हेडली (जो नंतर धर्मांतर करुन दहशतवादी झाला) याला मुंबईवर हल्ला करण्याची योजना आखण्यात साहाय्य केले, असा भारताचा आरोप आहे. त्यासाठी तो भारताला हवा आहे. राणा सध्या अमेरिकेत कारागृहात असून त्याचे भारताला प्रत्यार्पण करावे, असा आदेश अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे तो भारताच्या ताब्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांचे एक दल लवकरच अमेरिकेला जाऊन यासंबंधी प्रक्रियेचा प्रारंभ करणार आहे.
2011 मध्ये शिक्षा
राणा याला अमेरिकेतील शिकागो येथील न्यायालयाने 2011 मध्ये कारावासाची शिक्षा सुनावली होती. त्याला पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबाला पाठबळ देण्याच्या गुन्ह्यासाठी ही शिक्षा देण्यात आली आहे. याच दहशतवादी संघटनेने मुंबईतील दहशतवादी हल्ला घडविला होता. त्याने हेडली याला त्याच्या शिकागोतल्या स्थलांतरित कायदा व्यवसायाची शाखा मुंबईत स्थापन करण्यासाठी, तसेच या कंपनीचा एक प्रतिनिधी या नात्याने डेन्मार्कचा दौरा करण्याची अनुमती दिली होती, असाही आरोप होता. याच प्रकरणामध्ये गुन्हा सिद्ध झाल्याने राणा याला अमेरिकेत प्रदीर्घ कारावासाची शिक्षा झाली होती.
भारताचे आरोप कोणते…
भारतालाही अनेक दहशतवादी कृत्यांसाठी राणावर अनेक आरोप आहेत. भारताविरोधात युद्ध पुकारणे, हत्या, अनेक प्रकारची अफरातफर, कागदपत्रांचे घोटाळे आणि दहशतवादी हल्ले अशा अनेक गुन्ह्यांसाठी तो भारताला हवा आहे. अमेरिकेत त्याला शिक्षा झाल्यानंतर त्वरित भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी केली होती आणि त्या संबंधीची प्रक्रियेलाही अमेरिकेच्या न्यायालयात आरंभ केला होता. आता तो भारताला मिळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
अमेरिकेला विनंती
10 जून 2020 मध्ये भारताने अमेरिकेला राणा याला प्रत्यार्पणासाठी अस्थायी स्वरुपात अटक करण्याची मागणी केली होती. ती अमेरिकेच्या जोसेफ बायडेन प्रशासनाने मान्य केली होती. साऱ्या जगातून दहशतवाद संपविण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. त्या धोरणाला अनुसरुन ही अटक करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण त्यावेळी अमेरिकेच्या गृहविभागाने राणाच्या अटकेसंदर्भात दिले होते.
पुढे काय करावे लागणार…
अमेरिकेतून तहव्वूर राणा याचे भारताला प्रत्यार्पण करण्यासाठी प्रशासकीय औपचारिता पूर्ण करावी लागणार आहे. यासठी अमेरिकेच्या प्रशासनाकडे भारताला एक आवेदनपत्र सादर करावे लागणार असून ही प्रशासकीय प्रक्रिया त्वरित पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रशासन आहे. हे प्रशासनही दहशतवादाच्या विरोधात असल्याने भारताला औपचारिकता पूर्ण करण्यात कोणतीही बाधा येण्याची शक्यता नाही, असे तज्ञांचे मत आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली, तर राणा याचा ताबा भारताला मिळेल. नंतर त्याला भारतात आणण्यात येऊन त्याच्यावर भारतीय कायद्यांच्या अनुसार येथील न्यायालयात अभियोग चालविला जाईल. ही सर्व प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करुन मुंबई दहशतवादी हल्ला पीडितांना न्याय मिळवून देण्याचा भारताचा प्रयत्न असेल.









