मास्क, बेड, ऑक्सिजन तयार ठेवण्याची सूचना
बेळगाव : कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-1 थोपविण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचना राज्य सरकारने केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी गुरुवारी आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता गृहित धरून बेड, ऑक्सिजन, आयसीयु बेडची कमतरता भासू नये, याची खबरदारी घेण्याची सूचनाही त्यांनी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी सायंकाळी ही बैठक झाली. जेएन-1 थोपविण्यासाठी आवश्यक तयारी करण्याची सूचना आरोग्य विभागाला करण्यात आली. राज्य सरकारच्या मार्गसूचीनुसार सीमाभागात तपासणी वाढवावी, श्वसनाचा आजार असणाऱ्यांची कोविड तपासणी करावी, असा सल्ला देण्यात आला.
ज्यांना लक्षणे आहेत, अशा रुग्णांची त्वरित तपासणी करावी, वैद्यकीय उपचारासाठी सरकारी व खासगी इस्पितळात स्वतंत्र व्यवस्था करावी. ताप, खोकला, सर्दी आदींची लक्षणे आढळून आल्यास रुग्णांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आरोग्य विभागानेही यासंबंधी जागृती करावी. इस्पितळात सेवा बजावणारे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी खबरदारी म्हणून मास्क परिधान करण्याची सूचना बैठकीत करण्यात आली. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. यापूर्वी आलेल्या कोरोनाच्या दोन्ही लाटेत अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागला आहे. त्यावेळचा अनुभव लक्षात घेऊन बेड व ऑक्सिजनची कमतरता भासू नये, याची काळजी घ्यावी. उपचारासाठी इस्पितळात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांपासून अंतर ठेवावे. त्यांनीही स्वत:च्या सुरक्षेसाठी मास्क परिधान करावेत, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली. यावेळी मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी, प्रांताधिकारी श्रवण नायक, जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण अधिकारी डॉ. महेश कोणी, जिल्हा सर्जन विठ्ठल शिंदे, अप्पर जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. एस. एस. गडेद आदींसह अनेक अधिकारी या बैठकीत उपस्थित होते.
बिम्समध्ये आरोग्य खात्याची बैठक
केरळ, महाराष्ट्र व गोवा राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार राजू सेठ, जिल्हा आरोग्य खात्यातर्फे पूर्वतयारी बैठक घेण्यात आली. येथील बिम्समध्ये ही बैठक पार पडली. कोरोना संसर्गाचा फैलाव होण्यापूर्वी पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. यासाठीच ही बैठक घेण्यात आली. यापूर्वी कोरोनाकाळात अनेक चुका झाल्या होत्या. त्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये यादृष्टिने ही बैठक घेण्यात आली. राज्य सरकारकडून सूचना करण्यात आल्याने खबरदारी घेण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा रुग्णालयात 908 कोविड खाट आहेत. 78 व्हेंटीलेशन व इतर सुविधा उपलब्ध आहेत. तसेच कोरोनाकीटसाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला असून लवकरच आवश्यक प्रमाणात कीट उपलब्ध होणार आहेत. शेजारील राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले असले तरी सीमावर्तीभागात कोणत्या उपाययोजना राबवाव्यात, याबाबत सरकारकडून मार्गसूची जारी करण्यात आलेली नाही. त्यामुळे नवीन मार्गसूचीनुसार पुढील उपाययोजना केल्या जातील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. 100 टक्के व्हॅक्सिनेशन झाले आहे. त्यामुळे रोगाचा तितका प्रभाव दिसून येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजू सेठ यांनी आपल्या राज्यात तसे कोणतेच रुग्ण आढळून आलेले नाहीत. त्यामुळे भीतीचे कारण नाही. मात्र पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून रुग्णालयात पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी, बिम्सचे संचालक डॉ. अशोक शेट्टी आदी उपस्थित होते.









