प्रादेशिक आयुक्तांच्या उपस्थितीत निवडणूक
बेळगाव : महापौर मंगेश पवार आणि नगरसेवक जयंत जाधव यांच्या अपात्रतेच्या निर्णयाचा स्थायी समिती निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसून ठरल्याप्रमाणे बुधवार दि. 2 रोजी स्थायी समिती निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे कौन्सिल विभागाकडून निवडणूक व मतदानाची तयारी करण्यात आली आहे. बुधवार दि. 2 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 पर्यंत विविध चार स्थायी समित्यांसाठी इच्छुक असलेल्यांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. त्यानंतर दुपारी 3 वाजता मुख्य सभागृहात अर्थ व कर स्थायी समिती, आरोग्य स्थायी समिती, बांधकाम स्थायी समिती व लेखा स्थायी समितीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. पहिल्या सत्रात नाडगीत होणार आहे.
त्यानंतर उपस्थितांची हजेरी, कोरम तपासणी, उमेदवारी अर्जांची छाननी, निवडणुकीतून माघार घेणे, निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा, त्यानंतर बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ते मतपेटीत टाकले जाईल, त्यानंतर मतमोजणी व निकाल जाहीर केला जाणार आहे. प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टेण्णावर हे निवडणूक अधिकारी म्हणून उपस्थित राहणार आहेत. सदर निवडणूक प्रक्रिया बॅलेट पेपरवर घेतली जाणार असून मतदान केल्यानंतर मते पेटीत टाकावी लागणार आहेत. सोमवारीच मुख्य सभागृहात आसन व्यवस्था, त्याचबरोबर मतदानाच्या पेट्या ठेवण्यासह इतर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. सदर निवडणूक बिनविरोध होणार की यासाठी मतदान होणार हे पहावे लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीनुसार स्थायी समितीसाठी 58 पैकी 56 नगरसेवक मतदानासाठी पात्र आहेत. तर 7 पदसिद्ध सदस्य पात्र असणार असून या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.









