वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची जगद्विख्यात अवकाश संशोधन संस्था इस्रो या महिन्यात आपले 100 वे प्रक्षेपण करणार आहे. या प्रक्षेपणासाठी या संस्थेने जोरदार सज्जता केली आहे. या प्रक्षेपणाच्या माध्यमातून 2 हजार 250 किलोग्रॅम वजनाचा संचार उपग्रह अवकाशात प्रस्थापित केला जाणार आहे. 29 जानेवारीला या अत्याधुनिक उपग्रहाचे प्रक्षेपण संस्थेच्या श्रीहरीकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरुन केले जाणार आहे.
या उपग्रहाचे अवकाश आयुष्यमान 12 वर्षे इतके असेल. या उपग्रहाचा उपयोग दूरसंचार आणि इतर महत्वाच्या सुविधांसाठी होणार आहे. एनव्हीएस-02 या नावाचा हा उपग्रह इस्रोच्या नव्या पिढीतील उपग्रहांपैकी दुसरा आहे. त्याची निर्मिती पूर्णत: स्वदेशी आहे. या उपग्रहाची तरंगक्षमता एल 1 श्रेणीतील असून ही श्रेणी अमेरिकेच्या ग्लोबल पोझिशनिंग व्यवस्थेत उपयोगात आणली जाते. जीएसएलव्ही वाहनावरुन या उपग्रहाचे प्रक्षेपण केले जाईल, अशी माहिती देण्यात आली आहे. अवघ्या 19 मिनिटांमध्ये हा उपग्रह अवकाशात 36 हजार 577 किलोमीटर अंतरावरील कक्षेत प्रस्थापित केला जाणार आहे. या उपग्रहात अत्याधुनिक सेन्सर्स आणि अन्य उपकरणे बसविण्यात आली आहेत.









