गणेशोत्सवाच्या पूर्वतयारीची लगबग सर्वत्र सुरू आहे. महाराष्ट्रात दुष्काळी आणि महागाईचे सावट असले तरी पारंपरिक पद्धतीने श्री गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा करण्यात येणाऱ्या कोकणात सध्या उत्साही वातावरण निर्माण झालेले आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे, बसेस सोडण्यात आल्या असून नव्याने सुरू करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेचे गणेशोत्सवाचे बूकिंगही फुल्ल झालेले आहे. मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवापूर्वी एकेरी वाहतूक सुरू करण्यासाठी महामार्गाचे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवासाठी विक्रमी संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होणार असे चित्र आहे.
कोरोनानंतरचा गतवर्षीचा गणेशोत्सव अगदी उत्साहात पार पडला. त्यानंतर हे दुसरे वर्ष असून 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. कोकणात अतिशय भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने आर्थिक उलाढालही मोठी असते. उत्सवकाळ हा अतिशय मंगलमय, प्रसन्नतेचा आणि आत्मिक समाधान देणारा असतो. दरवर्षी साधारणत: ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव येत असतो. मात्र, यावर्षी अधिक श्रावणमास आल्याने उशिराने 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे.
यावर्षीचा गणेशोत्सव हा दुष्काळी आणि महागाईच्या सावटाखाली साजरा होणार आहे. महाराष्ट्रात यावर्षी खूपच पाऊस कमी झाला आहे. विदर्भ मराठवाड्यात तर पावसाने पाठच फिरवली आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती असून ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तर भीषण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. कोकणातही यावर्षी म्हणावा तसा पाऊस पडला नाही. राज्यात बऱ्याच जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर महागाईचे सावट आहे.
भाज्यांचे दर वाढलेले आहेत. डाळी, कडधान्याचेही दर वाढले आहेत. गणेश मूर्तीचे दरही वाढलेले आहेत. सर्वसामान्य लोकांच्या आवाक्याबाहेर आता महागाई जात चालली आहे. एवढी सगळी परिस्थिती असली तरी कोकणात मात्र गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी पूर्वतयारीची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे. कोकणातील गरिबातला गरीब व्यक्ती सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत असतो आणि यावर्षीही तो करणार असून त्याच्या पूर्वतयारीची लगबग कोकणात सुरू झालेली आहे.
श्रावण महिना सुरू होताच अनेक सणांची लगबग सुरू होते आणि त्यासोबतच घरातल्या सर्व लोकांची, अप्रत्यक्षरित्या उद्योग व्यवसायाचीदेखील लगबग सुरू होते. कोरोनाकाळात आर्थिक चक्र विस्कळीत झाले होते. मात्र, ते आता पुन्हा रुळावर आले आहे. गणरायाच्या आगमनाच्यावेळी मोठ्या जल्लोषात ढोलताशांच्या गजरात मिरवणुका काढल्या जातात आणि उत्सव साजरा केला जातो. नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, पोळा, गणेशोत्सव आणि इतर विविध उत्सव काळात खरेदी विक्रीमुळे आर्थिक चक्र सुरू राहते आणि पैसा बाजारात फिरत राहतो. इतरवेळी लोक मोठ्या प्रमाणात खरेदी करीत नाहीत. त्यात कमीअधिक प्रमाणात सर्वांनाच फायदा होतो. त्यामुळे गणेशोत्सवाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. कोकणात तर घरोघरी सण साजरा करत असल्यामुळे गणेशाच्या आगमनाची अधिक उत्सुकता असते.
कोकणातील लोक हे सार्वजनिक गणेशोत्सवापेक्षा पारंपरिक पद्धतीने घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यामुळे कोकणात एक गाव एक गणपती ही संकल्पना रुजली नाही किंवा सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रमाणही अत्यल्प आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात केवळ 32 सार्वजनिक गणपती विराजमान केले जातात आणि 69 हजार घरगुती गणपती विराजमान होतात, तर रत्नागिरी जिल्ह्यात सार्वजनिक 114 गणपती विराजमान केले जातात व 1 लाख 66 हजार घरगुती गणपती विराजमान होतात. त्यामुळे सार्वजनिक गणपतीपेक्षा घरगुती गणपती मोठ्या प्रमाणात केले जातात. घरोघरी उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण असते. म्हणूनच जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी घरी परतलेला दिसतो.
पारंपरिक पद्धतीने कोकणात घरोघरी गणेशोत्सव साजरा केला जात असल्याने मुंबईसह विविध शहरात राहणारे लेक देशविदेशात राहणारे चाकरमानी आवर्जून गणेशोत्सवाला आपल्या घरी येत असतात. कोरोनाच्या काळात काही बंधनांमुळे अनेक लोकांना गावी यायला मिळाले नाही, परंतु आता कोरोनामुक्त वातावरणामुळे गणेशोत्सवासाठी यावर्षी विक्रमी संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतील अशी शक्यता आहे. त्यादृष्टीने शासनाकडून चाकरमान्यांसाठी जादा रेल्वे व बसेसचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांनी सहा महिने अगोदरच रेल्वे, बसेसचे बुकिंग केलेले आहे. त्याशिवाय चाकरमान्यांसाठी मोदी एक्सप्रेस सोडण्यात आली आहे. कोकण रेल्वेच्या गणेशोत्सव हॉलिडे स्पेशल म्हणून मोठ्या प्रमाणात जादा रेल्वे सोडण्यात आलेल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसचे तिकीट दर जास्त असले तरी गणेशोत्सवाला येणाऱ्यासाठी म्हणून वंदे भारत एक्सप्रेसचे बुकिंगही फुल्ल झालेले आहे. दुर्देवाने विमान सेवा मात्र कोलमडलेली आहे. मोठा गाजावाजा करून सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उद्घाटन केले. मात्र विमानसेवा सुरळीत सुरू राहिली नाही. गणेशोत्सवापूर्वी 1 सप्टेंबरपासून विमानसेवा सुरळीत होईल व दररोज विमान येईल असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केले होते, परंतु विमानसेवा सुरळीत होवू शकली नाही. रेल्वे बससेवेच्या माध्यमातून यावर्षी दहा लाखाहून अधिक चाकरमानी कोकणात गणेशोत्सवासाठी येतील असा अंदाज वर्तवला आहे.
विमानसेवा सुरळीत करता आली नाही तरी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीने व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण जातीनीशी लक्ष घालत आहेत. त्यांनी महामार्गाच्या कामासाठी पहाणी दौराही केला. त्यानंतर महामार्गावरील ख•s बुजवण्याचे काम सुरू झालेले आहे. तर गणेशोत्सवापर्यंत महामार्गावर एकेरी वाहतूक तरी सुरू होण्याच्या दृष्टीने महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कशेडी घाटातील बोगद्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असून हलक्या वाहनांची चाचणीही घेण्यात आली आहे. महामार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गणेशोत्सव काळापूरते वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे. गणेशभक्तांना प्रवासामध्ये अडचण येऊ नये यासाठी गणेशोत्सवकाळात महामार्गावर अवजड वाहनांना वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आलेली आहे.
कोकणात पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव हा सण शांततेत व तेवढाच उत्साहात पार पाडण्यासाठी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाकडूनही सर्व तयारी करण्यात आलेली आहे. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे दोन्ही जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर स्वागत करणे, त्यांची आरोग्य तपासणी करण्याचे नियोजन केले आहे. महामार्गावर ठिकठिकाणी मदत केंद्रे स्थापन करून वैद्यकीय व पोलीस पथक ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून 15 सप्टेंबरपासून त्याची कार्यवाही सुरू होणार आहे. रेल्वे व बस स्थानकांवर वैद्यकीय पथके तैनात ठेवण्याचे नियोजन करण्यात आले असून संशयित रुग्णांची तपासणी करून उपचार केले जाणार आहेत. गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे चोख नियोजनही करण्यात आलेले आहे.
एकूणच कोकणात गणेशोत्सवाच्या तयारीची लगबत सुरू असून बाजारपेठाही सजू लागल्या आहेत. चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. महागाई असो वा दुष्काळी सावट असो सर्वत्र उत्साही वातावरण निर्माण झाले आहे. गणेशोत्सवात कोकणात गणपतीसमोर भजनांचा कार्यक्रम सर्वत्र असतो. हे लक्षात घेवून सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने भजनमंडळांना भजनाचे साहित्य देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेवून गणेशोत्सवापूर्वी भजनी मंडळांना साहित्य वाटपही केले आहे. जिल्हा परिषदेचा हा निर्णय लक्षवेधी ठरलेला आहे. आता गावागावात भजनांचा कार्यक्रम अधिक जोमाने होऊन उत्साही वातावरण राहणार आहे. आता फक्त गणरायाच्या आगमनाची कोकणवासीयांना आतुरता आहे.
संदीप गावडे








