बाजारपेठेसह सर्वत्र चतुर्थीचे वातावरण : आकर्षक गणेशमूर्ती शोरूममध्ये दाखल,हौशी कलाकारांच्या रात्री जागू लागल्या,घरांमध्ये साफसफाईनंतर रंगरंगोटी सुरु
डिचोली : गोमंतकातील सर्वात मोठा सण असलेल्या गणेश चतुर्थीच्या तयारीला सर्व पातळीवर जोर आलेला आहे. बाजारपेठेत सध्या चतुर्थीचे वातावरण तयार झाले आहे. गणेश मूर्ती तयार होणाऱ्या चित्रशाळांमध्ये सध्या रात्री जागू लागलेल्या आहेत. घराघरांमध्येही गणेशाच्या आगमनासाठी सज्जता सुरू झाली आहे. बहुतेक घरांमध्ये साफसफाई संपवून रंगरंगोटी सुरु झाली आहे. एकंदरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी झाल्यानंतर लगेच चतुर्थीच्या तयारीला वेग आलेला आहे. डिचोली तालुक्मयातील सर्व भागांमध्ये गणेश चतुर्थीचा उत्साह मोठा असतो. या उत्साहाला साजरा करण्यासाठी लोकांकडून जय्यत तयारी केली जाते. सध्या वाढती महागाई पाहता या उत्सवांमध्ये खर्चाचा समतोल राखणे सर्वांसाठीच कसरतीचे ठरते. परंतु आपल्या प्रिय गणरायाच्या स्वागतासाठी प्रसंगी उसने पैसे घेऊनही हा सण साजरा करणारे लोक आहेत. खिशात काही नसले तरी चालेल, पण देवावरील श्र्रध्देत, भावनेत व सेवेत कुठेही कमी पडता कामा नये. या एकाच विचाराने प्रत्येक भक्तगण आपले घर सजवित असतो.
चित्रशाळांमध्ये दिवसरात्र लगबग
आकर्षक गणेशमूर्ती प्रत्येक घरातील शोभेत भर टाकत असते. सर्व सजावट करून आकर्षक व सुबक अशी गणेशमूर्ती मखरात विराजमान करण्यात मोठा आनंद असतो. या आनंदासाठी गोमंतकीय भाविक प्रसंगी कितीही पैसे मोजायला तयार असतात. सध्या सर्व गणेशमूर्ती चित्रशाळांमध्ये मूर्तींना रंगविण्याचे काम सुरू आहे. या कामाचा सध्या जोर वाढला असून वेळेत हे काम पूर्ण करण्यासाठी सध्या गणेश चित्रशाळांमध्ये रात्री जागू लागल्या आहेत. घरातील कलाकारांसोबत शेजारी पाजारीही या कलाकारांच्या मदतीला येत आहेत. दररोज रात्री उशिरापर्यंत मूर्ती रंगविण्याचे काम सुरूच असते. रात्रीच्या थंड व मंद वातावरणात रंगकामात एकाग्रता लाभते, असे मेस्तवाडा विठ्ठलपूर कारापूर येथील कलाकार गुरूदत्त वांतेकर यांनी सांगितले.
अनेक गणेशमूर्ती शोरूममध्ये दाखल
या गणेशमूर्ती साकारण्याच्या कामाला बहुतेकजण वटपौर्णिमेला प्रारंभ करतात. म्हणजेच जून महिन्यापासून सुरू होणारे हे काम सप्टेंबरपर्यंत म्हणजेच जवळपास चार महिने चालते. या कलेतील कलाकार हे या कामात चार महिने व्यस्त असतात. त्यांनी साकारलेल्या गणेशमूर्ती रंगवूनही विक्रीसाठी शोरूममध्ये दाखल झालेल्या आहेत. राज्यातील विविध ठिकाणी विव्रेते गणेश मूर्तीकरांकडून मूर्ती घेऊन त्यांची विक्री करतात. त्यात मूर्तीकार आणि विव्रेता या दोन्ही घटकांचा व्यवसाय होतो.
बाजारपेठ सजली चवथीच्या रंगात
डिचोली तालुक्मयातील डिचोली व साखळी या दोन मोठ्या बाजारपेठा आहेत. या बाजारांमध्ये मोठ्या संख्येने लोकांची वर्दळ आसते. गणेश चतुर्थीसाठी आवश्यक असलेल्या सामानाची सध्या या बाजारपेठांमध्ये उपलब्धता होऊ लागली आहे. सजावटीचे सामान, आकर्षक विद्यूत उपकरणे व लाईट्स, रंगबेरंगी पताका, मखरे, पडदे, कृत्रिम फुलांच्या माळा व इतर सामान नुकतेच बाजारात दाखल झाले आहे. तसेच बाजारात व इतर ठिकाणी वाजणाऱ्या गणेशाच्या आरती, भजनाची गाणी यामुळे चतुर्थीचे वातावरण तयार झाले आहे. येणाऱ्या आठवड्यात या बाजारांमध्ये केवळ चतुर्थीचेच वातावरण असणार आहे.
कालचा रविवार घरांच्या साफसफाईचा
गणेश चतुर्थी येत्या मंगळ. 19 सप्टें. रोजी होणार आहे. त्यापूर्वी एक रविवार मिळतो. परंतु त्यावेळी सर्वत्र गोंधळाचेच वातावरण असणार. कालचा (दि. 10) रविवार हा जास्तीत जास्त घरांमधील कामे उरकून घेण्याचाच रविवार होता. सर्वांनी या रविवारचा लाभ उठवत आपापल्या घरांची साफसफाई केली. झाडणे व रंगकाम करण्यात दिवस घालवला. चतुर्थीत घरामध्ये वापरण्यात येणाऱ्या माटोळी, चवाय, पाठ व इतर सामानांची साफसफाई हाती घेतली आहे.
शासकीय पातळीवरूनही तयारीला वेग
गणेश चतुर्थीनिमित्त सर्वत्र परिसर साफ व स्वच्छ ठेवण्यासाठी सरकारी पातळीवरून तसेच पंचायत व नगरपालिका पातळीवरून कामांना वेग देण्यात आलेला आहे. विविध ठिकाणी असलेल्या गणेश विसर्जन स्थळांची साफसफाई करण्यात येत आहे. रस्त्यांच्या बाजूला वाढलेली झाडेझुडपे कापण्याचे काम सुरू आहे. रस्त्यांची व पायवाटांची डागडुजी सुरू आहे. रस्त्यांवरील पथदिवे दुऊस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.









