प्रमुख नेत्यांच्या वास्तव्यासाठीची स्थाने निर्धारित
वृत्तसंस्था / नवी दिली
सप्टेंबरच्या दुसऱ्या सप्ताहात येथे होणाऱ्या जी-20 शिखरपरिषदेची तयारी जोरात आणि शिस्तबद्ध पद्धतीने होत आहे. या परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष जोसेन बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आदी सर्व प्रमुख देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या भव्य स्वागताची आणि वास्तव्याची सज्जता करण्यात आली आहे.

दिल्लीच्या सुरक्षा विभागाने या नेत्यांच्या वास्तव्य स्थानांची माहिती प्रसारित केली आहे. या महितीनुसार अमेरिकेच्या अध्यक्षांच्या वास्तव्यासाठी आयटीसी मौर्य हे अत्याधुनिक हॉटेल निर्धारित करण्यात आले आहे. तर चीनचे अध्यक्ष ताज पॅलेसमध्ये वास्तव्य करणार आहेत. बायडेन यांची ही प्रथम भारतभेट असेल. ते वास्तव्य करणाऱ्या हॉटेलच्या प्रत्येक मजल्यावर अमेरिकेच्या गुप्तचर विभागाचे रक्षक उपस्थित राहणार आहेत. दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे.
35 पंचतारांकित हॉटेले उपलब्ध
दिल्लीतील 35 सप्ततारांकित आणि पंचतारांकित हॉटेलांमधील कक्ष आणि सभागृहे निर्धारित करण्यात आली आहेत. या हॉटेलांनी कडक तपासणी करण्यात येत आहे. अमेरिका आणि चीनप्रमाणे फ्रान्स, ब्रिटन आणि रशियाच्या सुरक्षा रक्षकांची दले येथे पोहचण्यास प्रारंभ झाला आहे. राष्ट्रप्रमुखांना भारताच्या सुरक्षा रक्षकांसमवेत त्यांच्या देशांची संरक्षणव्यवस्थाही उपलब्ध करुन देण्यात येत आहे. 20 हजारांहून सुरक्षा रक्षक आणि पोलिस नियुक्त केले जाणार आहेत. तसेच हजारो सैनिक राखीव म्हणून ठेवले जाणार असल्याची माहिती देण्यात आली.
त्रिस्तरीय सुरक्षा
शिखर परिषदेत सहभागी होणाऱ्या नेत्यांना त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था देण्यात येणार आहे. दिल्ली पोलिस, अर्धसैनिक दले तसेच त्या त्या देशांची सुरक्षा दले नियुक्त करण्यात येत आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सर्व प्रकारांची सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येत आहे, अशी माहिती देण्यात आली.
संचारबंदी लागू होणार
परिषदेच्या कालावधीत दिल्लीत सर्वसामान्यांसाठी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. लॉकडाऊनप्रमाणे वातावरण असेल असे स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत दिल्लीच्या जनतेची अडचण होणार असली तरी त्याला पर्याय नाही, असेही प्रतिपादन केंद्रीय प्रशासनाने केले आहे. नागरीकांना होणाऱ्या त्रासासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची क्षमा यापूर्वीच मागितली आहे.
कोण येणार आहेत ?
जी-20 परिषदेच्या सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांची त्यांच्या पत्नी किंवा पतींसह उपस्थिती अपेक्षित आहे. आमंत्रित देशांचे प्रमुखही त्यांच्या कुटुंबासह येण्याची शक्यता आहे. अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, दक्षिण कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्कस्थान, ब्रिटन आणि अमेरिका तसेच युरोपियन महासंघ हे या परिषदेचे सदस्य देश आहेत. तर बांगला देश, ईजिप्त, मॉरिशस, नेदरलँडस्, नायजेरिया, ओमान, सिंगापूर, स्पेन आणि संयुक्त राष्ट्रसंघ हे निमंत्रित देश आहेत.
दिल्लीचे रुपांतर किल्ल्यात
ड परिषदेच्या कालावधीत संपूर्ण दिल्ली आणि परिसरात कडेकोट सुरक्षा
ड परिषदेला येणाऱ्या राष्ट्रप्रमुखांना त्रिस्तरीय सुरक्षा उपलब्ध केली जाणार
ड परिषद काळात राजधानीत सर्वसामान्यांसाठी लॉकडाऊन सदृश स्थिती
ड 8 सप्टेंबरपासून राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधीमंडळे येण्यास प्रारंभ होणार









