386 निवारा केंद्रे, 262 गो-शाळा सज्ज, आपत्ती निवारण पथक जिल्हय़ात ठाण मांडून

प्रतिनिधी /बेळगाव
पावसाचा जोर वाढला असून नद्यांच्या पाण्यामध्येदेखील वाढ झाली आहे. महाराष्ट्रातून अद्याप नद्यांना पाणी सोडण्यात आले नाही. मात्र नदीचा प्रवाह वाढल्यामुळे नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काही गावे स्थलांतरित करण्यासाठी तयारी सुरू आहे. त्यासाठी 386 केंद्रे आणि 262 गो-शाळा उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच बागलकोट येथील जिल्हाधिकाऱयांशी तसेच इतर अधिकाऱयांशी संपर्कात असून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास लोकांना मदत करण्यासाठी सर्व तयारी केल्याची माहिती त्यांनी दिली. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून वरील सर्व जिल्हय़ांतील जिल्हाधिकाऱयांशी सतत बैठका घेण्यात आल्या आहेत. त्यांच्याशी संपर्क ठेवण्यात आला आहे.
आपत्ती निवारणासाठी 65 जणांचे पथक ठाण मांडून
प्रत्येक तालुक्मयामध्ये एका नोडल अधिकाऱयाची नियुक्ती केली आहे. सदर अधिकारी पाहणी करून जिल्हा केंद्राशी संपर्क साधणार आहेत. पुरासंदर्भात माहिती देण्यासाठी कंट्रोलरूमचीही स्थापना केली आहे. राज्यातूनही आपत्ती निवारणासाठी 65 जणांचे पथक जिल्हय़ात ठाण मांडून आहे. याचबरोबर 28 जणांची एनडीआरएफ तुकडीदेखील सज्ज ठेवण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.
कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
कृष्णा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. राजापूर धरणामधून अद्याप पाणी सोडण्यात आले नाही. सध्या 88 हजार 360 क्मयुसेक पाणी या नद्यांमधून फ्लो होत आहे. त्यामुळे सध्यातरी भीतीचे काही कारण नाही. 2 लाख 40 हजार क्युसेक पाणी जर फ्लो होत असेल तर काही गावांना त्याचा फटका बसू शकतो. त्यामुळे आतापासूनच तयारी करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बोम्माई यांनी 8 तारखेलाच व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून राज्यातील जिल्हाधिकाऱयांसह जिल्हा पोलीसप्रमुख, पोलीस आयुक्त, जिल्हा पंचायतीचे अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. पाऊस तसेच नद्यांना येणाऱया पाण्यावर सतत नजर ठेवण्यात आली आहे. अधिक पाऊस झाल्यास काही गावांना स्थलांतर करावे लागणार आहे. त्याची तयारी झाली असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले. याचबरोबर निपाणी येथेही पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी बैठक घेऊन अधिकाऱयांना सूचना केली आहे.
पूनर्वसन केंद्र स्थापण्यासाठी मनपाकडून हालचाली
पावसाचा जोर वाढल्याने पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. शहरातील नालाकाठावरील वसाहतींमधील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे जिल्हय़ात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांसाठी पूनर्वसन केंद्रांची स्थापना करण्याच्यादृष्टीने आवश्यक तयारी करण्याची सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी सामान्य प्रशासन विभागाला केली.
सध्या सर्वत्रच पावसाचा जोर वाढला आहे. नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असल्याने विविध जलाशयामधील अतिरिक्त पाणी नद्यांमध्ये सोडण्यात येत आहे. परिणामी सीमाभागातील नद्यांना पूर येण्याचा धोका आहे. पावसाचा जोर वाढल्यास पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्मयता आहे. शास्त्रीनगर, मराठा कॉलनी, विवेकानंद कॉलनी, नानावाडी, समर्थनगर, बाळकृष्णनगर, इद्रप्रस्थनगर अशा विविध भागात नाल्याचे पाणी शिरते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यास समस्या निर्माण होतात. पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास घरात राहणे धोकादायक आहे. त्यामुळे पूनर्वसन केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन महापालिका आयुक्तांनी सामान्य प्रशासन व विविध विभागांच्या अधिकाऱयांची बैठक घेऊन पूनर्वसन केंद्र स्थापन करण्याबाबत चर्चा केली.









