वार्ताहर/कडोली
नवरात्रोत्सव आणि ऐतिहासिक दसरा उत्सवाच्या निमित्ताने कडोली येथील जागृत देवस्थान श्री कलमेश्वर मंदिरात तयारी पूर्ण झाली आहे. तर प्रत्येक गल्लीत विद्युत रोषणाई आणि पताक्यांनी सुशोभित झाल्या आहेत. कडोली येथील ऐतिहासिक दसरा उत्सवाची मोठी ख्याती असून या पार्श्वभूमीवर पंधरा दिवस अगोदरच देवस्थान पंचकमिटी, ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांची लगबग सुरू झालेली असून गावपातळीवर प्रत्येक घरांमध्ये झाडलोट, घरांची रंगरंगोटी, स्वच्छता मोहीम पूर्ण केली आहे. तर देवस्थान पंचकमिटीने गेले पंधरा दिवस झाले ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिराला रंग लावणे, मंदिर परिसर स्वच्छता मोहीम हाती घेऊन पूर्ण केले आहे. प्रत्येक गल्लीच्या युवक मंडळांनी आपापल्या गल्ल्या सुशोभित करण्याचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. दसरा उत्सव आणि नवरात्रोत्सव पार्श्वभूमीवर संपूर्ण गाव भगव्या पताक्या आणि विद्युत रोषणाईनी झळाळून निघणार आहे. श्री कलमेश्वर मंदिरात नवरात्रोत्सवाला अनेक भक्तमंडळी उपवास करीत नापजप करतात. तर रोज सात दिवस श्री कलमेश्वर भजनी मंडळ, श्री कलमेश्वर सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळ, श्री ज्यातिर्लिंग महिला भजनी मंडळाचा भजन-हरिपाठाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर गावात उत्साहाचे वातावरण पसरले आहे. दसरोत्सवात बैलांची मिरवणुकही तितक्याच थाटात व्हावी, यासाठी शेतकरी बैलांना उठावरदार दिसण्यासाठी सर्व ती तयारी करीत आहे. दि. 30, दि. 1, 2 ऑक्टोबर रोजी कडोली गावचा दसरोत्सव साजरा होणार आहे.









