रामलल्लानंतर विराजमान होणार ’राजा राम’ : लवकरच होणार तारखेची घोषणा
वृत्तसंस्था/ अयोध्या
अयोध्येत भगवान रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला एक वर्षापेक्षा अधिक काळ उलटल्यावर आता भव्य राम मंदिरात आणखी एका सोहळ्याची तयारी केली जात आहे. या सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. राम मंदिरात भगवान श्रीरामाचा भव्य दरबार निर्माण करण्यात आला आहे. हा दरबार मंदिराच्या पहिल्या मजल्यावर निर्मित असून त्याला राम दरबार म्हणून स्थापित केला जाणार आहे.
या सोहळ्याला भव्य स्वरुप देण्याची तयारी सध्या सुरू आहे. काही दिवसांपूर्वी श्रीराम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत सोहळ्याच्या तयारीची समीक्षा करण्यात आली आणि ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांना अभिषेक सोहळ्याच्या तिथीची घोषणा करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. हा सोहळा 22 जानेवारी 2024 च्या भव्य सोहळ्याप्रमाणे होणार नसला तरीही याचे स्वरुप अत्यंत व्यापक असणार आहे.
राजा रामचा अभिषेक कार्यक्रम मंदिर निर्मितीचा एक प्रकारचा समारोप देखील असेल, ही मंदिर निर्मिती 2020 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सुरू झाली होती. मंदिर उभारणी समितीचे नेतृत्व सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे माजी मुख्य सचिव नृपेंद्र मिश्र करत आहेत. मंदिर परिसराचे निर्मिती कार्य चालू महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. तर परिसराच्या भिंतीचे काम चालू वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मिश्र यांनी अलिकडेच दिली होती.
कसा असणार राम दरबार?
रामलल्लाची 51 इंच उंच मूर्ती भगवान रामाच्या जन्मस्थळी एका बालकाच्या स्वरुपात कर्नाटकातील मूर्तिकार अरुण योगीराज यांच्याकडून निर्माण करण्यात आली होती. तर राम दरबाराची निर्मिती जयपूरमध्ये पांढऱ्या रंगाच्या मकराना संगमरमराने मूर्तिकार प्रशांत पांडे यांच्या नेतृत्वात 20 कारागिरांच्या एका टीमकडून करण्यात आली आहे. मंदिर परिसरात रामायणाचे सर्वात लोकप्रिय स्वरुप रामचरितमानसचे रचेते संत तुलसीदास यांचा एक विशाल पुतळा देखील स्थापन केला जाणार आहे. तर निसर्गासोबत ताळमेळ कायम राखण्यासाठी सुमारे 20 एकर भूमीचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे.









