पुढील आठवड्यात होणार निर्णय : सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्व खाद्य अणि वस्त्राsत्पादनांना समान स्वरुपात 5 टक्के जीएसटी श्रेणीत आणण्याची तयारी सुरू आहे. सरकार खाण्यापिण्याच्या सामग्रीपासून वस्त्राsत्पादनांवरील जीएसटीला 5 करण्याचा निर्णय घेणार असल्याचे समजते. भारत सरकारच्या जीएसटी सुधार योजना (जीएसटी 2.0) अंतर्गत हा प्रस्ताव अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या पावलाचा उद्देश करसंरचना सुलभ करणे, वर्गीकरण वाद समाप्त करणे आणि सर्वसामान्य लोकांसाठी आवश्यक वस्तूंचा खर्च कमी करणे आहे. हा प्रस्ताव 3-4 सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या आगामी जीएसटी परिषदेच्या बैठकीत मांडला जाणार आहे.
बांधकाम क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या सिमेंटवरील करात कपात करण्यासंबंधीही चर्चा सुरू आहे. खासकरून यावरील वर्तमान 28 टक्के कराची श्रेणी 18 टक्के करण्याची योजना आहे. हे पाऊल ग्राहकांसाठी बांधकाम खर्च कमी करू शकते, परंतु याकरता बांधकाम उद्योगाने हे लाभ खरेदीदारांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. हा प्रस्ताव संमत झाल्यास बांधकाम उद्योगात संतुलन आणि पारदर्शकता आणणार आहे.
जीएसटी परिषदेची 3-4 सप्टेंबर रोजी होणारी बैठक अनेक प्रस्तावांवर विचार करणार असून यात अनेक दैनंदिन आणि आवश्यक वस्तू आणि सेवांवरील जीएसटीच्या दरात कपात करण्याचा मुद्दा सामील आहे.
विमा क्षेत्रालाही दिलाशाची अपेक्षा
वैयक्तिक विमा आणि आरोग्य विम्यावर जीएसटी शून्य टक्के असावा असा प्रस्ताव जीएसटी परिषदेत मांडला जाणार असल्याचे मानले जात आहे. हा निर्णय घेण्यात आल्यास विम्याची व्याप्ती वाढणार असून लोकांसाठी हा किफायतशीर पर्याय ठरू शकणार आहे, यामुळे व्यापक आरोग्य कव्हरेजला चालना मिळणार आहे. हा पुढाकार वित्तीय सुरक्षेला चालना देण्यात एक मोठी भूमिका बजावू शकतो.









