विविध ठिकाणचे तलाव सज्ज, लाईट-क्रेनचीही व्यवस्था : विसर्जनावेळी सावधानता बाळगणे आवश्यक
बेळगाव : गणेशोत्सवाला मंगळवारपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस व दहा दिवसांच्या गणपतींचे विसर्जन केले जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने सर्व ती तयारी करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनासाठी जुन्या कपिलेश्वर तलावाचा परिसर स्वच्छ केला. तर नव्याने बांधण्यात आलेल्या तलावाचे स्वच्छता काम युद्धपातळीवर सुरू आहे. याचबरोबर रामेश्वर तलाव, वडगाव येथील नाझर कॅम्प, जुने बेळगाव येथील तलाव, अनगोळ येथील ढब्बू तलाव, किल्ला तलाव सज्ज ठेवण्यात आले आहेत. सोमवारी महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते रामेश्वर तलावाचे पूजन करण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्या वाहनांचीही व्यवस्था केली आहे. महापालिकेने एकूण 12 वाहने तयार ठेवली आहेत. पाच, सात आणि दहा दिवसांच्या घरगुती मूर्ती विसर्जनासाठी नियोजन करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे यांनी सांगितले आहे. सर्व तलावांमध्येही व्यवस्था केली असली तरी दरवर्षीप्रमाणे ज्यांना घरासमोरच मूर्तीचे विसर्जन करायचे आहे, त्यांनी या वाहनांचा लाभ घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
कपिलेश्वर येथील दोन्ही बाजूच्या तलावांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्याठिकाणी परिसरातील घरगुती मूर्तीही विसर्जित केल्या जातात. त्यांच्यासाठी सोय केली आहे. शहापूर, गोवावेस व टिळकवाडी येथील काही नागरिक जक्कीनहोंड येथील हौदामध्ये मूर्तींचे विसर्जन करतात. त्याठिकाणी सध्या स्वच्छता करून पाणी सोडण्यात आले आहे. वडगाव येथील नाझर कॅम्प येथेही पाण्याचा मोठा हौद बांधण्यात आला आहे. त्याठिकाणी दरवर्षी गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. यावर्षी शहापूरच्या सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने तो हौद धोकादायक असल्याचे सांगितले आहे. मात्र, सध्या विसर्जन करण्यासाठी कोणतीच अडचण नसून घरगुती मूर्ती त्याठिकाणी सावधानता बाळगत विसर्जन केल्या तरी चालतील. वडगाव, खासबाग परिसरातील नागरिकांना जुने बेळगाव येथील कलमेश्वर तलावामध्ये मूर्ती विसर्जन करण्यासाठी सोय केली आहे. मोठ्या सार्वजनिक मूर्तींबरोबरच घरगुती मूर्ती विसर्जन करण्यासाठी महापालिकेने संपूर्ण तयारी केली आहे. अनगोळ येथील ढब्बू तलावाची पाहणी महापौर शोभा सोमनाचे यांनी यापूर्वीच केली होती. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी येथील अडचणी दूर केल्याने ढब्बू तलावही गणेशमूर्ती विसर्जनासाठी सज्ज केला आहे.
नागरिकांना सहकार्याचे आवाहन
किल्ला तलावामध्येही गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. जास्तीतजास्त याठिकाणी घरगुती गणेशमूर्तींचेच विसर्जन करण्यात येते. या ठिकाणीही लाईट व क्रेनची व्यवस्था केली आहे. चार दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी त्याठिकाणी पाहणी करून कर्मचाऱ्यांना सूचना केल्या होत्या. एकूणच शहरातील विविध तलावांमध्ये मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने सर्व ती तयारी केली असून जनतेनेही त्याला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्री रामेश्वर तलावाजवळील विद्युत बॉक्सची दुरुस्ती करा
रामेश्वर (जक्कीनहोंड) तलावाजवळ विद्युत बॉक्स उघडाच आहे. त्याठिकाणी कोणाचाही हात लागल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. गणेशमूर्ती विसर्जनावेळी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मोठा अपघात घडू शकतो. तेव्हा तातडीने विद्युत बॉक्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.









