भारत एकीकडे बुलेट ट्रेन चालविण्याच्या तयारीत आहे, तर दुसीरकडे अनेक छोट्या प्रकल्पांवरही काम करत आहे. याच मोहिमेच्या अंतर्गत रेल्वे मंत्रालय पुल-पुश रेल्वे चालविण्याची तयारी करत आहे. लवकरच मुंबई आणि पाटणा दरम्यान अशाप्रकारची रेल्वे चालविली जाऊ शकते. अशाप्रकारच्या रेल्वेमुळे कामासाठी बाहेर जाणाऱ्या लोकांना फायदा होणार आहे.
परंतु पुल-पुश रेल्वे म्हणजे काय असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाजिक आहे. ज्या लोकांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला आहे, त्यांना याविषयी काही प्रमाणात कल्पना असू शकते. पुल-पुश रेल्वे एक अशाप्रकारची रेल्वे असते, ज्यात दोन इंजिन्स असतात, एक समोरच्या बाजूला तर दुसरे मागील बाजूला. दोन्ही इंजिन एकाचवेळी रेल्वेला पुढे ढकलतात आणि मागे खेचतात देखील. अशाप्रकारे रेल्वेला पुढे जाण्यासठी केवळ एका इंजिनची आवश्यकता नसते.
पुल-पुश रेल्वे चालविण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वप्रथम यामुळे रेल्वेचा वेग सहजपणे वाढू शकतो. याचबरोबर रेल्वेची क्षमता यामुळे मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच रेल्वे चालविण्यासाठी कमी शक्तीचे इंजिन पुरेसे ठरते, यामुळे रेल्वेचा खर्च कमी करण्यास मदत होणार आहे. पुल-पुश रेल्वेंचा वेग पारंपरिक रेल्वेंच्या तुलनेत अधिक असणार आहे. या रेल्वेंमध्ये अधिक डबे जोडले जाऊ शकतात. म्हणजेच अधिक प्रवासी एकाचवेळी प्रवास करू शकणार आहेत. यामुळे तिकीट वेटिंगची समस्या निकालात निघेल. रेल्वेत जनरल आणि स्लीपर क्लासचे एकूण 22 डबे जोडले जातील. प्रारंभी ही नॉन-एसी स्वरुपाची असेल.









