अंतिम परीक्षा पंधरा दिवसांवर : जिल्ह्यात 52,185 विद्यार्थी देणार परीक्षा
बेळगाव : पीयुसी द्वितीय वर्षाची अंतिम परीक्षा अवघ्या पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने विद्यार्थी रात्रंदिवस अभ्यासाला लागले आहेत. यावर्षी बेळगाव जिल्ह्यातून 52,185 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. बेळगाव व चिकोडी या दोन्ही शैक्षणिक जिल्ह्यांचा निकाल वाढविण्यासाठी पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून तयारी केली जात आहे. राज्यात पहिल्या दहामध्ये बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्याचा समावेश व्हावा, यासाठी कंबर कसली जात आहे. 2021-22 ला बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल 59.88 टक्के लागला होता. त्यावेळी जिल्ह्याचा 26 वा क्रमांक लागला होता. 2022-23 मध्ये 73.98 टक्के निकाल लागला असून राज्यात 25 वा क्रमांक लागला. परंतु, शैक्षणिक जिल्ह्याची घसरण काही थांबलेली नाही. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात एकूण 145 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 191 पदवीपूर्व महाविद्यालये आहेत. यापैकी बेळगावमध्ये 30 सरकारी कॉलेज आहेत. अनेक महाविद्यालयांना कायमस्वरुपी प्राचार्य नसल्याने प्रभारींवर काम चालवावे लागत आहे. जिल्ह्यात 305 हून अधिक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे निकाल वाढविण्यासाठी प्रयत्न झाले तरी प्राध्यापकांची कमतरता असल्याने त्याचा निकालावर परिणाम होत आहे. अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी विद्याथ्यर्नां मार्गदर्शन, तसेच गेस्ट लेक्चररद्वारे माहिती देण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असणार आहे, तसेच वेळेचे नियोजन कसे करावे, यासंदर्भातही विद्याथ्यर्नां माहिती देण्यात आली आहे. दि. 1 ते 22 मार्च दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात 42 परीक्षा केंद्रांवर 23,359 विद्यार्थी तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 53 परीक्षा केंद्रांवर 28,826 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सध्या अकरावीची अंतिम परीक्षा सुरू असून ही परीक्षा संपताच बारावीच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे.
परीक्षा प्रक्रियेत माध्यमिक शिक्षकांना सामावून घेणार
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल वाढविण्यासाठी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच पदवीपूर्व महाविद्यालयांना सूचना करण्यात आल्या आहेत. ज्या महाविद्यालयांचा निकाल मागील काही वर्षांपासून कमी लागत आहे, त्यांना अतिरिक्त वर्ग घेण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षा प्रक्रियेत प्राध्यापकांची संख्या कमी पडल्यास माध्यमिक शाळा शिक्षकांना सामावून घेतले जाणार आहे.
– एम. एम. कांबळे (जिल्हा शिक्षणाधिकारी, पदवीपूर्व शिक्षण विभाग)









