सुधाकर काशीद, प्रतिनिधी
Kolhapur News : यातले बहुतेक जण कोठेही शिकत नाहीत, जे शिकतात ते . वेळेवर जात नाहीत. मात्र रोज सकाळी सातला तयार होऊन म्हणजे मोटर सायकल , केसाची लोंबनारी स्टाईल, केसाचा एक झुपका सोनेरी ,पायात बिन सॉक्सचे बुट , हातात मनगटावर विविध रंगाचे दोरे ,एखादी साखळी अशा पेहरावात हे बाहेर पडतात.क्लासला ,शाळेला ,कॉलेजला जाणारी प्रत्येक मुलगी आपल्याकडेच पाहते याच पूर्ण भ्रमात ते असतात.आणि शहरातील भवानी मंडप ,आझाद चौक ,बिन खांबी गणेश ,ताराराणी विद्यापीठ समोर रस्ता,पद्माराजे समोरची बाग ,न्यू कॉलेज समोरचा कोपरा,खास बागेतला बस स्टॉप ,विवेकानंद कॉलेज समोरचा रस्ता अशा ठिकाणी येऊन उभारतात .येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकीकडे डोळे फाडून पाहत असतात.आणि एखादीच्या मागेपुढे ठरवून मोटरसायकल मुद्दाम पळवतात.कोल्हापुरातले रोज दिसणारे हे चित्र…
हे चित्र मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या हृदयाची धडधड वाढवणारे आहे.अशा टोळक्यांची मानसिकता खूप विचित्र आहे.आपण खूप देखणे आहोत.आपल्याकडे प्रत्येक मुलगी पाहणारच या भ्रमात आहेत.क्षणभर या वयात असा भ्रम मान्य आहे.पण या टोळक्यात एक विचित्र अशी मग्रुरी आहे.मुलींच्या मागे लागून, त्यांचा नको इतका पाठलाग करत मुलींचे मानसिक खच्चीकरण करण्याची त्यांची पद्धत आहे.ताराबाई रोड,भवानी मंडप ,न्यू कॉलेज समोरचा रस्ता , रंकाळा स्टँड ,खासबाग ,आझाद चौक ,ताराराणी विद्यापीठ रस्ता येथे अगदी सकाळ सकाळी कारवाई झाली तर या परिसराशी कसलाही संबंध नसताना तेथे घिरट्या घालणारे शंभरभर ऑन द स्पॉट सापडतील अशी सध्याची परिस्थिती आहे.
अठरा ते वीस वयोगट आणि त्या वयोगटातील तरुणांच्यात होणारे काही भावनात्मक बदल हे नैसर्गिक आहेत. या वयात काही खोड्या होणार हे देखील ठरलेले आहे.पण अलीकडे या खोड्यांची बदललेली पद्धत,त्याला असलेली दहशतीची ,मग्रुरीची जोड खूप विचित्र ठरत आहे .ठराविक कोपरा म्हणजे आपलाच .तेथे उभारून आपण काहीही केले तरी चालते अशी टवाळ पोरांची समजून झाली आहे . भीती हा प्रकार संपला आहे.अतिरिक्त पोलीस प्रमुख पदावर ज्योतिप्रिया सिंग असताना सकाळ सकाळी स्वत: मोटरसायकल वरून कोल्हापुरातील हॉटस्पॉट वर त्या फिरत होत्या. या तरुण मुलांना गुह्याच्या कचाट्यात अडकवण्या ऐवजी त्यांना भर रस्त्यात पोलीस खाक्या दाखवत होत्या.त्यामुळे या डीएसपी बाईचा मोठा दबदबा झाला होता.
अर्थात याच एका कामावर पोलिसांची सारी ताकद नक्कीच वापरता येणार नाही.पण अशा टोळक्यावर चाप बसवणे पोलिसांना नक्कीच शक्य आहे .कारण अशी चमकोगिरी करणारी टोळकी ठरावीक आहेत.त्यांच्या उभारण्याची बसण्याची ठिकाणे ठरली आहेत. ठराविक बस स्टॉप च्या परिसरात त्यांचे आहेत. त्यांच्या मोटरसायकलच्या नंबर प्लेटवर काही दादा लोकांची ,नेत्यांची नावे छायाचित्रे ठळक आहेत .आपण कोणाचा माणूस आहे हे कळावे यासाठी जी त्यांची ही एक स्टाईल आहे .काही मुली या टोळक्याच्या असल्या ठगुणावर ठ फिदा होणाऱ्याही आहेत. त्या एकदा त्यात गुरफटल्या की, त्यांची होणारे हाल म्हणजे न सांगण्याचा प्रकार आहे .मोबाईल मुळे तर हा त्रास त्यांना क्षणाक्षणाला भोगावा लागत आहे .
या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात अशा टोळक्याला नागरिकांनी ,मुलींनी चपलाचा चोप दिला आहे.त्यांचे कपडे फाडले आहेत.या पोरांच्या चंदेरी सोनेरी रंगाच्या केसाच्या झिंज्या खेचल्या आहेत.पण असे धाडस दाखवणाऱ्या मुली खूप कमी आहेत.कारण आपल्याकडे ज्या मुलींच्या मागे मुले लागतात त्या मुलीतच काहीतरी खोट आहे असे मानण्याची एक विचित्र पद्धत आहे.
त्यामुळे अशा टोळक्यांना भर रस्त्यात पोलिसांचा खाक्या दाखवणे हा एकच मार्ग आहे.त्यासाठी निर्भया पथक आहे.पण या पथकाला कधी ठ अट्टलठ सापडतच नाहीत.कॉलेजच्या दारात सहज उभारणाराही या पथकाच्या कारवाई सापडतो.टोळक्यातले पद्धतशीरपणे पळून जातात.आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नवी सावज हेरण्यासाठी झुलपे उडवत कोप्रयावर येतात. त्यामुळे या पथकाने कारवाईत सातत्य राखणे गरजेचे आहे.नाहीतर अशा टोळक्याच्या अनामिक भीतीचे सावट पांघरूनच मुलींना वावरावे लागणार आहे.
सावध भुमिका…
टवाळखोर मुली आमच्या आवारात नसतात .कॉलेज बाहेरच्या रस्त्यावर असतात.त्यामुळे आम्हाला त्यांच्यावर कारवाई करता येत नाही अशी सावध भूमिका शाळा कॉलेज खाजगी क्लास चालकांची आहे. या टवाळकर पोरांशी पंगा कशाला घ्यायचा या मनस्थितीत आहेत.
पोक्सो अंतर्गत कारवाई…
अल्पवयीन मुलींची छेडछाड व त्यांना त्रास देणाऱ्यावर थेट पोक्सो कायद्या अंतर्गत कारवाई केली जाईल असे जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सतीश गुरव यांनी सांगितले. ते म्हणाले , निर्भया पथक कार्यरत आहेच .पण त्यांची गस्त आणखी वाढवली आहे.दोन-तीन दिवसांपूर्वी बालगोपाल तालमीसमोर ज्यांनी मुलींची छेड काढली त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.









