पिंपरी / प्रतिनिधी :
भारतीय जनता पार्टी एक निवडणूक झाली, की पुढच्या निवडणुकीची तयारी करत असते. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील विधानसभेच्या २८८ आणि लोकसभेच्या ४८ जागांची आम्ही तयारी करत आहोत. शिवसेनेच्या वाट्याला किती जागा येतील, हे आताच ठरविण्याचे काही कारण नाही. त्यांना आमची तयारी उपयोगी पडेल, असे मत राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शंकरराव मासुळकर अर्बन हेल्थ सेंटर व आय रुग्णालय, भोसरी गवळीमाथा आणि कासारवाडीतील कचरा हस्तांतरण केंद्राचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले. त्या वेळी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा सहावा दिवस असून त्याबाबत अद्याप तोडगा निघाला नसल्याबाबत विचारले असता पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेन्शनबाबत सकारात्मक असल्याचे वारंवार सांगितले आहे. त्यासाठी वरिष्ठ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. माझे सर्व कर्मचाऱ्यांना आवाहन आहे, की परीक्षेचा कालावधी आहे. रुग्णांचे भयंकर हाल होत आहेत. त्यामुळे निदान अत्यावश्यक सेवा सुरू ठेवाव्यात. कोणत्याही संपाचे दोन भाग असतात. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करायचे असते. बाकीच्यांनी संप करायचा असतो. पण, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही संपात उतरले आहेत. सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत नकारार्थी नाही. त्याचा भार किती पडेल, याचा अभ्यास करण्यासाठी वेळ लागेल.
अधिक वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचे आता डोळे उघडले, आ. धंगेकर यांचा टोला