केएलईचे संचालक-विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांची माहिती
बेळगाव : वैद्यकीय शाखेचा अभ्यासक्रम स्वीकारणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट परीक्षा सक्तीची आहे. मात्र, पीयूसीदरम्यान या परीक्षेची तयारी करून घेण्याऐवजी दहावीमध्येच नीट परीक्षेची तयारी करून घेतली जाईल. डिसेंबर व जानेवारीमध्ये दोन चाचणी परीक्षा आणि दहावीच्या अंतिम परीक्षेनंतर एक चाचणी परीक्षा होईल. या परीक्षेत 97 टक्केहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात 50 टक्के आणि 95 ते 96.9 टक्के गुण मिळविणाऱ्या पहिल्या 25 विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात 25 टक्के सूट दिली जाईल, अशी माहिती केएलई संस्थेचे संचालक व विधान परिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, केएलई संस्थेची स्थापना 1916 मध्ये झाली. आजपर्यंत शिक्षण, आरोग्य आणि कृषी या क्षेत्रात केएलईने आपला ठसा उमटविला आहे. संस्थेची 30 विज्ञान महाविद्यालये असून तेथे यंदा 90 टक्क्यांच्यावर निकाल लागला आहे. अलीकडेच सर्वोच्च न्यायालय व भारत सरकारच्या वैद्यकीय शाखेसाठी नीट परीक्षा सक्तीची केली आहे. त्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्याचा केएलई संस्थेचा मानस आहे.
नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेत केएलई पीयू कॉलेजच्या समृद्धी देसाई हिने 720 पैकी 705 गुण मिळविले व तिला पाँडिचेरी येथे वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळाला आहे. तसेच 20 विद्यार्थ्यांनी 600 हून अधिक, 50 विद्यार्थ्यांनी 500 हून अधिक गुण मिळविले असून मेरीटवर 71 जणांनी एमबीबीएस तर 21 जणांनी बीडीएसला प्रवेश मिळविला आहे. मात्र, शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांची नीट परीक्षेची तयारी करून घेतली तर त्यांच्यासाठी पुढील परीक्षा अधिक सुखकर ठरणार आहे. या हेतूने दहावीच्या विद्यार्थ्यांची नववी आणि दहावीच्या गणित आणि विज्ञान विषयांवर आधारित सीईटी घेतली जाईल आणि दहावीच्या अंतिम परीक्षेनंतर एक सीईटी घेतली जाईल. केएलईशी निगडीत सर्व विज्ञान महाविद्यालयांमध्ये या परीक्षा होतील. शिवाय लवकरच अथणी आणि गदग येथेही पीयू कॉलेज सुरू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या परीक्षेत 97 टक्के अथवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात 50 टक्के आणि 95 ते 96.99 टक्के गुण मिळविणाऱ्या 25 विद्यार्थ्यांना प्रवेश शुल्कात 25 टक्के सवलत दिली जाईल. दहावीच्या परीक्षेत केएलईशी निगडीत शाळांमधून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा प्रवेश शुल्कात सुट दिली जाणार आहे, अशी माहिती कवटगीमठ यांनी दिली. पत्रकार परिषदेला माजी उपाध्यक्ष एम. सी. कोळ्ळी, प्राचार्य वेणुगोपाल तसेच रमेश, महेश भाते, संजय पाटील, एस. व्ही. नंजप्पण्णवर व एम. पी. सतीश उपस्थित होते.









